पुणे : बंडखोरी करून गुहाटीला गेलेल्या एकनाथ शिंदेंना पुण्यातून सर्वप्रथम माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी पाठिंबा दिला. तेव्हापासून नाना भानगिरे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत. मात्र आता हेच नाना भानगिरे पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याला कारणही आहेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वारंवार भानगिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना सध्या पुण्यातील शिवसैनिकांमध्ये आहे. यामुळेच नाराज असलेले नाना भानगिरे पक्षाला राम राम करणार असल्याच्या चर्चांनी सध्या पुण्यात जोर धरला.
पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या सभेसाठी उपस्थित होते. ही सभा संपल्यानंतर एकनाथ शिंदे हे पुणे शहराध्यक्ष नाना भानगरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार होते. यासाठी मोठी जय्यत तयारी नाना भानगिरे व त्यांच्या समर्थकांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जेसीबी देखील सज्ज होता. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी नाना भानगिरे यांच्या घरी जाणं टाळलं. यामुळे पुण्यातील शिवसैनिक चांगलेच नाराज झाले.
मुख्यमंत्र्यांकडून नाना भानगिरे यांना डावललं जाण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधी दोन वेळा मुख्यमंत्रींनी नाना भानगिरेंना डावलले अशी चर्चा सुरू आहे. यापूर्वी नाना भानगिरे यांनी हडपसर मध्ये भव्य अशी सेना कुस्ती स्पर्धा भरवली होती. त्या स्पर्धेकडे देखील मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले होते. तेव्हापासून नाना भानगिरे आणि त्यांचे समर्थक मुख्यमंत्री शिंदेवर मोठ्या प्रमाणावर नाराज झाले आहेत. पक्ष सोडण्याच्या निर्णयावरती युवा सेना, युवती सेनेच्या ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये विचार सुरु आहे. आज एक बैठक घेऊन शिवसेना शिंदे गट सोडण्याच्या निर्णयावर नाना भानगिरे समर्थक चर्चा करणार आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे.
दरम्यान शिवसेनेतील काही ठराविक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देतात. त्यामुळे मुख्यमंत्री वारंवार अनेक पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात असा आरोप नाना भानगिरे यांचे समर्थक खाजगीत करताना दिसतात. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील ही नाराजी एकनाथ शिंदे कशी थांबवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.