अजित पवारांचं कारे, शिंदेंना झटका देणार शिवतारे; राजीनामा देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:00 AM2024-03-21T10:00:55+5:302024-03-21T10:02:53+5:30
बारामतील लोकसभा मतदार संघाची देशभरात चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.
Vijay Shivtare ( Marathi News ) : बारामतील लोकसभा मतदार संघाची देशभरात चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामती येथील पवार कुटुंबातील सर्वच सदस्य मैदानात उतरल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात बंड करण्याची तयारी सुरू केली आहे. बारामती लोकसभेची जागा लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावलं आहे, यावर आता विजय शिवतारे यांनी कडक भूमिका घेतली आहे.
सांगलीच्या आखाड्यात चंद्रहार पाटील चीतपट?; काँग्रेसनेच घेतली आघाडी
गेल्या काही दिवसापासून शेवसेना नेते विजय शिवतारे अजित पवार यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, काल माध्यमांसोबत बोलताना पवार यांनी शिवतारेंना प्रत्युत्तर दिलं. अजित पवार म्हणाले, शिवतारेंच्या उमेदवारीचं मला माहित नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन त्यांना सांगितलं आहे. आता वरिष्ठांचं ऐकायचं नाही ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला वातावरण खराब करायचं नाही. आम्हीही आरेला कारे करु शकतो. आम्हाला महायुतीमधील वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरे जायचं आहे, असंही अजित पवार म्हणाले होते, आता यावर प्रतिक्रिया देत विजय शिवतारे यांनी शिवसेनेचा राजिनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
"१५ वर्षे खासदार अजित पवार यांच्या बहिण सुप्रिया सुळेच होत्या तरीही त्यांनी धरणासाठी पैसे दिले नाहीत. आता ते आपल्या विचाराचा खासदार निवडून द्या पैसे देतो म्हणत आहेत.अगोदर कोणत्या विचाराचा खासदार होता, असा टोला विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना लगावला. या धरणाचा पाणी फक्त पुरंदरला पाणी नाही, भोर, व्हेला, पुरंदरला हे पाणी मिळणार आहे. या पाण्यासाठी किती वेळा खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठका घेतल्या, असा सवालही विजय शिवतारे यांनी केला. या धरणाचा काम पूर्ण झालं नाही याची पूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे, असंही विजय शिवतारे म्हणाले.
वेळ पडली तर शिवसेनेचा राजीनामा देऊ
"मी सध्या तांत्रिक बोलत आहे. मी आरेला कारे करत नाही, या धरणाच्या कामाच्या प्रश्नावर उत्तर द्या. लोकांची अजित पवार यांना मतदान करण्याची इच्छा नाही. महायुतीचा धर्म जरुर पाळला पाहिजे, महायुतीमध्ये जर एखाद्या उमेदवाराला एवढा विरोध होत असेल तर आम्ही ठरवू,वेळ पडली तर शिवसेनेचा राजीनामा देऊ. आमचे सर्व कार्यकर्ते सध्या या मानसिकतेत आहेत, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.