पुणे :युती झाल्यावर शिवसेना आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींमध्ये एकमेकांविषयी निर्माण झालेल्या प्रेमाची परिणीती शनिवारी पुण्यातही अनुभवायला मिळाली. पुरंदरचे शिवसेना पक्षाचे आमदार आणि जलसंपदा मंत्री विजय शिवतरे यांनी भविष्यात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
युतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारसभेत बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आरपीआयचे रामदास आठवले ,रासपचे महादेव जानकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की , सासवडला जी सभा झाली ती बघून वाटते की, पुढच्या वीस ते पंचवीस वर्षात महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान व्हावे. पुढे ते म्हणाले की,'1991साली दूध विकणाऱ्या अजित पवारांना मत द्या' ही शरद पवारांनी विनंती मान्य केली. त्यावेळी एका महाभ्रष्टाचारी नेत्याला जन्म देण्याचे महापाप त्या दिवशी आमच्याकडून घडले. पवारांनी पुन्हा मुलीला मत देण्याची विनंती केली. आम्ही तीदेखील मान्य केली. पवार यांनी देशाचे काम केले मग आम्ही संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासाठी खर्ची घालायची का असा सवालही त्यांनी विचारला.