शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील तुल्यबळ उमेदवारांची मांदियाळी असलेल्या; तसेच राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या शेलपिंपळगाव-रेटवडी जिल्हा परिषद गटात; तसेच त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या पिंपळगाव तर्फे खेड पंचायत समिती गणात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेची अत्यंत चुरशीची दुरंगी जुगलबंदी लढत रंगणार आहे, तर उर्वरित रेटवडी गणात राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसमध्ये अस्तित्वाची तिरंगी फाइट पाहायला मिळणार आहे. निवडणुकांच्या आरक्षण सोडतीनंतर शेलपिंपळगाव रेटवडी गटात ‘कही खुशी कही गम’चे वातावरण निर्माण झाले होते. कारण, तालुक्याच्या पूर्व भागातील या जिल्हा परिषद गटात सलग चौथ्यांदा सर्वसाधारण (पुरुष) आरक्षणाने हुलकावणी दिली आहे. परिणामी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या तरुण उमेदवारांचा अपेक्षाभंग झाला आहे. या उलट शेलपिंपळगाव पंचायत समिती गणाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीतील अपेक्षाभंग झालेल्या उमेदवारांनी थेट अर्धागिनीला निवडणूक रिंगणात उतरवले असून, प्रचार यंत्रणेला वेग दिला आहे. शेलपिंपळगाव-रेटवडी गटात राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या बहुळ गावच्या सरपंच निर्मला पानसरे व शिवसेनेच्या सुवर्णा मिसाळ यांच्यात होणाऱ्या कडव्या दुरंगी लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे, तर पिंपळगाव पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या वैशाली गव्हाणे विरुद्ध शिवसेनेच्या छाया होरे यांच्यातील दुरंगी लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. रेटवडी पंचायत समिती गणात राष्ट्रवादीकडून बिजली भालेकर, शिवसेनेकडून सुभद्रा शिंदे व काँग्रेसकडून अश्विनी वायळ यांच्यातील तिरंगी लढत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण, या गणातील अनुसूचित जमाती महिला हे आरक्षण खेड पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी राखीव आहे. (वार्ताहर)
शिवसेना राष्ट्रवादी आमनेसामने
By admin | Published: February 16, 2017 2:45 AM