पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात शिवसेना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा चमकणार का? असा प्रश्न जुन्या शिवसैनिकांच्या मनात निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी एकत्रित शिवसेनेचे शहरात २, जिल्ह्यात २ असे ४ आमदार, एक खासदार, राज्यात मंत्रिपद असे वैभव होते. फुटीनंतर यंदाच्या विधानसभेत जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी दोन्ही शिवसेनेला मिळून प्रत्येकी १ या प्रमाणे अवघ्या २ जागा मिळाल्या आहेत, त्या तरी निवडून याव्यात, अशी जुन्या शिवसैनिकांची भावना आहे.
एकत्रित शिवसेनेत मुंबईनंतर ठाणे व त्यानंतर एकत्रित शिवसेनेत पुणे शहराचे नाव घेतले जात होते. काका वडके, नंदू घाटे यांनी नगरसेवक होऊन तत्कालीन एकत्रित शिवसेनेला महापालिकेत स्थान दिले. त्यानंतर शशिकांत सुतार यांनी ते वाढवत नेले. त्यांच्या काळात कसबा पेठेतून शिवसेनेचे केंद्र कोथरूडला आले. त्यांच्याच काळात महापालिकेत शिवसेना नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली. सन १९९५ मध्ये ते स्वत: कोथरूडमधून आमदार झालेच, कॅन्टोन्मेंटमधून सूर्यकांत लोणकर, पिंपरी-चिंचवडमधून गजानन बाबर, पुढे कॅन्टोन्मेंटमधून महादेव बाबर असे आमदार झाले. पालिकेच्या सत्तेत शिवसेनेला वगळून कधीही विचार केला जात नव्हता.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर
पुढे मतदारसंघ पुनर्रचनेतही एकत्रित शिवसेनेने आपले अस्तित्व कायम ठेवले. शिवाजीनगरमधून विनायक निम्हण, कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे आमदार झाले. गजानन बाबर यांनी आमदारकीनंतर खासदारकीची निवडणूकही जिंकली. शिरूरमधून शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेनेला खासदार दिला. खेड आळंदीमधून सुरेश गोरे आमदार झाले. पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेतील नगरसेवकांची संख्याही वाढली. भाजप-शिवसेना युतीच्या काळात जागावाटप नेहमीच समसमान होत होते. शिवसेनेला मुंबईप्रमाणेच पुण्यातही मोठा भाऊ असेच स्थान होते. त्यामुळे पुण्यातील उपनगरासह ८ मतदारसंघांचे वाटपही ४ शिवसेना, ४ भाजप, असे समसमानच होत होते.
फुटीनंतर सगळेच लयाला
फुटीनंतर मात्र हे सगळे वैभव ओसरले आहे. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या त्याआधीच फक्त ९ झाली होती. आमदार एकही नव्हता. फुटीनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव शिंदेसेनेत गेले. आजी खासदार श्रीरंग बारणे यांनीही तीच वाट धरली. आता ते निवडून आल्यामुळे शिंदेसेनेला जिल्ह्यात एक खासदार आहे; पण आमदार किंवा नगरसेवक मात्र एकही नाही. उद्धवसेनेचीही तीच अवस्था आहे. जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या हे दोन्ही गट अस्तित्वहीन झाले आहेत. शिंदेसेनाला राज्यात मुख्यमंत्रिपद असतानाही त्यांच्या गटाची जिल्ह्यातील अवस्था अवघी १ जागा व तीसुद्धा जिल्ह्यातील अशीच आहे.
फुटीनंतर अस्तित्वाची लढाई
उद्धवसेनेचा महाविकास आघाडीत व शिंदेसेनेचा महायुतीमध्ये विधानसभेला जागा देण्यासाठीही विचार होत नव्हता. दोन्ही गटांना भांडून दोन जागा मिळवाव्या लागल्या. त्यातही शिंदेसेनेला पुणे शहरात एकही जागा नाही. पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांच्या माध्यमातून त्यांना तर उद्धवसेनेला कोथरूडमधून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना अशा प्रत्येकी एक याप्रमाणे फक्त दोन जागा दोन शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. त्या जिंकल्या जाव्यात, अशीच शिवसेनेबद्दल अजूनही आस्था असलेल्या अनेक जुन्या शिवसैनिकांची भावना आहे.