पुणे : केंद्र सरकारने मागील एक महिन्यात ११ वेळा इंधन दरवाढ देशातील जनतेवर लादली आहे. क्रूड तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात १०० डॉलरपेक्षा कमी होऊनही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत. याविरोधात आज शहर शिवसेनेच्या वतीने बालगंधर्व चौकात प्रतीकात्मक आंदोलन करून दरवाढीचा निषेध करण्यात आला़ या वेळी अॅम्ब्युलन्सऐवजी बैलगाडीतून रूग्णास नेऊन इंधन दरवाढीच्या परिणामाची दाहकता दाखविण्यात आली़
शहराध्यक्ष अजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात या वेळी घोषणाबाजी करण्यात आली़ केंद्र सरकारच्या भूमिकेमुळेच सर्वसामान्य माणसाचे जिणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाल्यामुळे सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत़ त्यामुळे महागाई गगनाला भिडली आहे़ अच्छे दिन येणार म्हणणाऱ्या मोदी-अंबानी सरकारमुळे आहे ते दिवस अत्यंत हलाखीचे झाल्याचे या वेळी मोरे यांनी सांगितले़
इंधन दरवाढीचा वेग आगामी काळात याच गतीने होत राहिला तर गाडीत पेट्रोल टाकण्याऐवजी गाडीवर पेट्रोल टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही मोरे यांनी सांगितले़ आंदोलनात मोरे यांच्यासह जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे, विजय देशमुख, शहर संघटिका सविता मते, संगीता ठोसर, निर्मला केंडे, छाया भोसले, नगरसेवक बाळा ओसवाल, संजय भोसले, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, श्वेता चव्हाण, अशोक हरणावळ, तानाजी लोणकर, आनंद मंजाळकर, योगेश मोकाटे, गजानन थरकुडे आदी सहभागी झाले होते़
-------------------------------------