सासवड : शिवसेनेचे पुरंदर तालुका प्रमुख व जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप सोपानराव यादव यांच्या श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैर कारभारामुळे संस्थेचे अध्यक्ष दिलीप सोपानराव यादव यांचे अध्यक्षपद आणि सदस्यपद पद रिक्त झाल्याची घोषणा अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, डॉ पी एल खंडागळे यांनी केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ व त्याखालील नियम ५८ मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दिलीप यादव यांनी त्यांचे सख्खे बंधू शिवाजी सोपानराव यादव यांची परिंचे येथील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ९७२ असलेल्या अनधिकृत बांधकामातील व्यापारी गाळे वाजवी किमतीपेक्षा जास्त किमतीने खरेदी करून संस्थेचे आर्थिक नुकसान केलेले आहे. याबाबत दिलीप यादव यांचे दुसरे सख्खे बंधू व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे सख्खे मेहुणे बाळासाहेब सोपानराव यादव व निलेश आनंदराव यादव या सभासदांनी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी मा अप्पर निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे पुराव्यानिशी लेखी तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने मा अप्पर निबंधक यांच्यासमोर याबाबत सुनावण्या झाल्या. यावेळी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर मा अप्पर निबंधक यांनी दि २२ एप्रिल २०२२ रोजी आदेश पारित करून त्यामध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक पद रिक्त केल्याची घोषणा केली आहे.
याबाबत तक्रार बाळासाहेब सोपानराव यादव व निलेश आनंदराव यादव यांनी, श्रीनाथ कृपा पतसंस्थेमध्ये अनेक प्रकारचे बोगस कर्ज वाटप केल्याच्या तक्रारी मा अप्पर निबंधक यांच्याकडे पुराव्यानिशी दाखल केल्या आहेत. त्याअनुषंगाने चाचणी लेखापरीक्षण व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये चौकशीचे आदेश पारित झाले होते. त्याबाबतही मंत्रालयीन स्तरावर व मा उच्च न्यायालयात खटले प्रलंबित आहेत., असे सांगितले. दरम्यान या आदेशामुळे सभासद व ठेवीदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.