पिंपरी : मुंबई - ठाण्याचा महापौर शिवसेनेचा असल्याचा अभिमान आहे. मुंबई - ठाण्यात शिवसेना वाढली, विस्तारली, फोफावली, अगदी दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन पोहोचली. मात्र, पुणे, पिंपरी - चिंचवडमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करायला लागतोय, हे चित्र चांगले नाही. पक्ष कमी पडला, पक्ष बांधणी झाली नाही, असे म्हणणे योग्य नाही. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. भविष्यकाळ शिवसेनेचा आहे, असा कानमंत्र शिवसेना नेते, खासदार, पुणे विभागीय संपर्क नेते संजय राऊत यांनी दिला. प्रभाग दोनचा होणार की तीनचा याचा विचार करत बसू नका, घासून नव्हे तर ठासून निवडून येईल, असा आत्मविश्वास बाळगा, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी शिरुर लोकसभा आणि पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिकांमध्ये भगवा फडकत नाही, याची खंत वाटते. शिवसेनेचे खासदार - आमदार निवडून येतात, पण महापालिका निवडणुकीत फुगा फुटतो. मागील निवडणुकीत चारच्या पॅनेल होते म्हणून पराभव झाला असे म्हणणे योग्य नाही. आपला पाया ढेपाळला होता, संघटनात्मक बांधणी कमकुवत होती, हे मान्य करायला हवे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका यंदा होता कामा नये. महाविकास आघाडी होईल का नाही, झाली तर काय, नाही झाली तर काय, या भानगडीत पडू नका. निवडणुका एकट्याच्या जीवावर लढायची सवय आपल्याला आहे. सगळया जागांवर स्वबळावर लढायची आपली तयारी आहे. मात्र, स्वाभिमान सोडून, भगव्या झेंड्याशी तडजोड करुन आघाडी होणार नाही. आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय, असे शिवसेनेचे धोरण आहे.
प्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता
शिवसेना गेल्या पन्नास वर्षापासून समाजकारणात - राजकारणात आहे. शिवसेनेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. तरुण - युवा पिढी जोडली गेल्याने नव्या उमेदीने, ताकदीने पक्षविस्तार झाला.पक्ष वाढीसाठी नवीन चेहेऱ्यांची गरज आहे. स्वत:चा विचार करताना पक्षाचाही विचार केला पाहिजे. पक्ष वाढला की सन्मान - प्रतिष्ठा आपोआप वाढते.मेळाव्याच्या व्यासपीठावर भरपूर पदाधिकारी बसले आहेत. प्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता येईल, असा आशावादही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.