पिंपरी : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराबाबत भाजपच्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवेदन घेण्यास नकार दिल्यावर शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी महापालिकेतील स्मार्ट सिटी कंपनीतील कोट्यवधींचा घोटाळा, श्वान निबीर्जीकरणातील भ्रष्टाचारावर बोलावे, भाजपातील भ्रष्टाचाऱ्यांची ईडी, इन्कमटॅक्स विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी भाजपच्या पिंपरी येथील पक्ष कार्यालयास भेट दिली. पक्ष पदाधिकारी, नगरसेवक यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप केले. दरम्यान, किरीट सोमय्या पिंपरीत येत असल्याची कुणकुण लागल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने मोरवाडी येथील भाजप कार्यालयाबाहेर गोळा झाले. शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक अॅड.सचिन भोसले, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटक सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे निश्चित झाले.
कायदा - सुव्यवस्था बिघडू नये यासाठी किरीट सोमय्या यांची भेट घेत त्यांना पिंपरी - चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार, श्वान निबीर्जीकरणातील भ्रष्टाचार याविषयी अवगत करण्याचे ठरले. लेखी निवेदन आणि पुरावे तयार करण्यात आले. पोलिसांमार्फत निरोपही देण्यात आला. तथापि, शिवसेनेच्या शिष्टमंडळास भेट देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबजी केली.