शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही, महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:05 IST2024-10-25T18:05:10+5:302024-10-25T18:05:53+5:30
पक्ष प्रमुखांना आमचा विचार करायचा नसेल तर शिवसेनेचे काम इथून पुढं करणार नाही, आणि महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही

शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही, महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत
पुणे : पुण्याच्या हडपसर विधानसभेत महाविकास आघाडी कडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघात ठाकरे गटाकडून महादेव बाबरही इच्छुक होते. हडपसरशिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्याची त्यांनी मागणीही केली होती. मात्र तो शरद पवार गटाकडे गेल्याने बाबर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही. तसेच आघाडीबरोबरही राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
बाबर म्हणाले, पुणे जिल्ह्यातील २१ जागांवर शिवसेनेनं एकही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे माझ्यासहित अनेक नेते पक्षावर नाराज आहेत. आताही हडपसरमध्ये शिवसेनेचा उमेदवार दिला नाही. शिवसेनेकडून जिंकण्याची तयारी झाली आहे. आता मात्र माझी स्पष्ट भूमिका सांगतो की, पदाधिकाऱ्यांचा म्हणणं काय? यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. शिवसेना पुढे जावी यावर आम्ही ठाम आहोत. पण पक्ष प्रमुखांना आमचा विचार करायचा नसेल. तर शिवसेनेचे काम इथून पुढं करणार नाही. काही झालं तरी आता महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही. आम्ही मातोश्रीला साहेबांना भेटायला गेल्यावर सकाळी ११ ते ५ बसून होतो. उद्धव साहेब आले ४० सेकंड आम्हाला भेटले आणि निघून गेले. माझा पुढचा निर्णय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना विचारून घेणार. आघाडीतील कुठल्याही शहाण्याने मला समजावण्याचा प्रयत्न करू नये.
२००९ साली हडपसर मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर २००९ साली युती आणि आघाडी यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये शिवसेनेचे महादेव बाबर यांना ६५ हजार ५१७, तर शिवरकर यांना ५५ हजार २०८ मते मिळाली होती. बाबर यांना २ हजार ०१८ मतांनी निवडून आले होते. २०१९ मध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून तर शिवसेना-भाजप युतीकडून योगेश टिळेकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चेतन विठ्ठल तुपे यांना ९२ हजार ३२६ तर योगेश टिळेकर यांना ८९ हजार ५०६ एवढी मते मिळाली होती. या निवडणुकीत केवळ २ हजार ८२० च्या फरकाने चेतन तुपे निवडून आले होते. २०१४ ची निवडणूक ही प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लढवली होती. यामध्ये ती भाजपकडून योगेश टिळेकर यांना ८२ हजार ६२९ तर शिवसेनेकडून महादेव बाबर यांना ५२ हजार ३८१ राष्ट्रवादीकडून चेतन तुपे यांना २९ हजार ९४७ तर काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर यांना २२ हजार १०० , प्रमोद भानगिरे यांना २५ हजार २०८ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपाच्या लाटेत ३० हजार मतांनी योगेश टिळेकर विजयी झाले होते.