राजगुरुनगर : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या माध्यमातून खेड तालुक्यात भरीव विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यामुळे विकासकामात व जनतेच्या समस्या सोडविण्यात आपण कुठेही कमी पडणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून औदर, येणिवे, कुडे, परसुल, खोपेवाडी व खरपुड या गावांना शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत भेटी देऊन ग्रामपंचायत सरपंच, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांसोबत संवाद साधला. या गावभेट दौऱ्यामध्ये गावातील नागरी समस्यांबरोबरच लोकांच्या अडीअडचणी त्यांनी समजावून घेतल्या. औदर येथील गावकारभाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत गावातील स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली. परसुल येथे झालेल्या गावभेट दौऱ्यात काकूबाई देवस्थानला भेट देऊन पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पाण्याची टाकी उपलब्ध करण्याची मागणी केली. खोपेवाडी येथे आदिवासी बांधवांच्या भेटीदरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी विहीर व पाइपलाइन कामासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. खेड तालुक्यातील खरपूड येथे आदिवासी ग्रामस्थांसोबत झालेल्या बैठकीत आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या काकूबाई खिंड ते खरपुड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली. याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना आढळराव पाटील यांनी केल्या.
या गावभेट दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, सुरेश भोर, विजया शिंदे ,शिवाजीराव वर्पे, प्रकाश वाडेकर, स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, रामदास धनवटे, ज्योती अरगडे, विजय शिंदे, किरण गवारे, गोरख बच्चे, धनंजय पठारे, विशाल पोतले, मारुती सातकर,सुभाष कदम, रायबा साबळे, सिद्धांत गायकवाड, सर्व गावचे ग्रामस्थ व नागरिक सहभागी झाले होते.
खेड तालुक्यातील आदिवासी भागात गावभेट घेऊन ग्रामस्थ व नागरिकांशी संवाद साधताना आढळराव.