पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून तसे फार काही चांगले संबंध राहिलेले नाही. त्यातच १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यांवरून तर ठाकरे सरकारमधील मंत्री सतत राज्यपालांवर निशाणा साधत असतात. मात्र, कोश्यारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळीच राजभवन गाठत राज्यपालांची सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच पुण्यात देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांना 'बॅनरबाजी'करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या निमित्ताने 'रिटर्न गिफ्ट'ची मागणी देखील केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज गुरुवारी (१७ मे) रोजी वाढदिवस आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील शिवसेनेच्या विभागप्रमुखांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. तसेच या निमित्ताने पोस्टबाजी करत आपल्या कार्यकर्त्यांसह केक देखील कापला. मात्र, याचवेळी त्यांनी कोश्यारी यांच्याकडे 'रिटर्न गिफ्ट' ची मागणी देखील केली आहे. या रिटर्न गिफ्टची सोशल मीडियावर जोरदार चांगलीच चर्चा रंगली आहे.
वडगांव बुद्रुक येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख निलेश गिरमे यांनी कोश्यारी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांसोबत केक कापला. याचवेळी महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्हाला विधान परिषदेचे १२ आमदार रिटर्न गिफ्ट म्हणून द्या, अशी मागणी केली आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरुन उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. सदस्यांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या नियमावलीतील सर्व गोष्टींची पूर्तता केली असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवसेनेकडून आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या १२ आमदारांच्या यादीला हिरवा कंदील दाखवणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.