पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर व महापालिका प्रशासनाने घरच्या घरी गणेश विसर्जन व फिरत्या हौदात गणेश विसर्जन ही मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात शक्य नसल्याचे सांगत, शिवसेनेने शुक्रवारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ आंदोलन केले. आंदोलकांनी वॉर्डस्तरावर चार तरी हौद सुरू करण्याची मागणी करीत, महापौर व महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन गणेश मुर्ती भेट दिली. या गणेश मुर्तीची दीड दिवस प्रतिष्ठापना करून आयुक्तांनी बादलीत ही मुर्ती विसर्जित करून दाखवावी असेही आवाहन आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांना केले. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, विशाल धनवडे, माजी नगरसेवक शाम देशपांडे व आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना संजय मोरे यांनी, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेली फिरत्या हौदांची संकल्पना ही गर्दीला आमंत्रण देणारी असल्याचा आरोप करून यामुळे आणखी कोरोनाचा संसर्ग होणार असल्याचे सांगितले. गर्दी टाळण्यासाठी या फिरत्या हौदांबरोबर प्रत्येक वार्डात चार तरी हौद गणेश विसर्जनासाठी पालिकेने उभारावेत़ अन्यथा आम्ही नदीवर जाऊन गणेश विसर्जन करू़ असा इशारा देताना त्यांनी याची सर्वस्वी जबाबदारी ही महापालिकेची व महापौरांची असेल असेही सांगितले.
पुण्यात वॉर्डस्तरावर हौद सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे महापालिकेसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 8:50 PM
आंदोलकांनी वॉर्डस्तरावर हौद सुरू करण्याची मागणी करत महापौर व महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
ठळक मुद्देमांडलेली फिरत्या हौदांची संकल्पना ही गर्दीला आमंत्रण देणारी असल्याचा आरोप