लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुख्यमंत्र्यांचा अवमान झाला म्हणून शिवसैनिकांनी भाजपाच्या कार्यालयात कोंबड्या सोडल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या दारात मांजर सोडले. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात असंसदीय घोषणांची राळ उडवत दिवसभर शहरात विविध ठिकाणी आंदोलने केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याचे पडसाद मंगळवारी (दि. २४) शहरात उमटले. शिवसैनिकांनी सकाळीच भाजपाच्या जंगली महाराज रस्त्यावरील सन्मान कार्यालयात कोंबड्या सोडल्या. राणे यांची हीच पात्रता असल्याची टीका करण्यात आली. स्वतः मुख्यमंत्री राहिलेल्या राणे यांना या पदाच्या मानमर्यादा ठाऊक नाहीत, भाजपाने फेकलेल्या सत्तेच्या तुकड्याने त्याचे भान गेले असल्याची टीका या वेळी शिवसेनेने केली. भाजपा कार्यालयात कोंबड्या सोडल्याची वार्ता थोड्याच वेळात शहरभर गेली.
त्यानंतर लगेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेच्या डेक्कन जिमखान्यावरील कार्यालयात मांजरं सोडली. काँग्रेसच्या दावणीला बांधून घेऊन शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाले आहे, त्यांना हीच भेट योग्य असल्याचे या वेळी भाजपाकडून सांगण्यात आले. शिवसेनेच्या वतीने गुडलक चौक, मंडईतील टिळक पुतळा आदी ठिकाणी राणे यांचा निषेध करण्यात आला. शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे अन्य कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी झाशीची राणी चौकात आंदोलन केले. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांना लक्ष्य करत असंसदीय भाषेत घोषणाबाजी केली.