पुणे : शिवसेनेची आता सटकलीय. त्यांचे काहीच ऐकू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली. मागील २५ वर्ष युतीमध्ये सडली. सरकार नालायक, आता युती करणार नाही, असे म्हणत होते. अफजल खान आता कुठे गेला. त्यांना व्हिजन नाही, असेही पवार म्हणाले. साम, दाम, दंड, भेद असे सगळे वापरून लोकांना छळले जात आहे. कारवाईची भीती दाखवून पक्षात घेतले जात असल्याचा आरोप पवार यांनी भाजपावर केला.
राज्यभरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अजूनही भाजपामध्ये इन्कमिंग सुरूच आहे. याचा समाचार घेताना पवार म्हणाले, एका नेत्याने सांगितले की, माझा एक खासगी व सहकारी साखर कारखाना आहे. ५० कोटी मिळाल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. म्हणून मला या सरकारमधले काही प्रमुख ५० कोटी देतो, आमच्या पक्षात या, असे बोलले’, असा गौप्यस्फोट पवार यांनी यावेळी केला. आम्ही पण सत्तेत होतो. विरोधकांचेही कारखाने आहेत. पण आम्ही कधीही असे खालच्या पातळीवरचे राजकारण केले नाही. तुझे काम मी करतो, आमच्या पक्षात ये, तुम्ही असे करा नाही तर चौकशी लावतो, असे सांगितले जात आहे. साम, दाम, दंड, भेद सगळं वापरत आहेत. आज जे जे दुसऱ्या पक्षात गेलेत, त्या प्रत्येकाचे नाव घेऊन सांगेन की कोण कशासाठी गेले आहे. सगळ््यांची माहिती माझ्याकडे आहे. आम्ही त्यांच्या बोलत होतो. थोडीशी कळ काढा असे सांगत होतो. यापुढे ते लाल दिवा देतो, खासदारकी देतो, महामंडळ देतो, असे सांगतील. पण त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे पवार यांनी सांगितले.