बी. एम. काळे, जेजुरीपुरंदर तालुक्यात केवळ विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार करून शिवसेनेने बाजी मारली. एक सेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव वगळता सर्वच नवखे उमेदवार उभे करून यश मिळविले आहे. या विजयाने काँगे्रस वगळता तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांना नुसतेच चारीमुंड्या चीत केले असे नाही, तर भविष्यात उभे राहण्याची उमेदही संपवून टाकली आहे. या पक्षांच्या नेतृत्वाला आत्मचिंतन करायला लावणारी ही निवडणूक ठरली.पिण्याचे पाणी, गुंजवणी धरण, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचे नियोजन, येऊ घातलेला विमानतळ, हडपसर-जेजुरी महामार्गाचे काम, औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण व त्यासाठीचे भूसंपादन याच प्रमुख मुद्द्यांवर शिवसेनेने नियोजनबद्ध प्रचार केला. शिवाय सेनेकडून प्रचारात पहिल्यांदाच एक बदल केला होता. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे व गटाचा आमचा संबंध नाही, याची अगदी गावागावांतील सभांमधून त्याच गावाच्या ग्रामदैवताची शपथ घेऊन खात्री दिल्याने मतदारांनीही सेनेला साथ दिली. याउलट, विरोधकांनी विकासकामाचे मुद्दे बाजूला ठेवून केवळ सेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाच लक्ष केले. मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसची या निवडणुकीत अशी काही वाताहत झाली आहे, की त्यातून सावरण्यासाठी त्यांना राष्ट्रीय नेत्याचीच गरज भासेल. मुळातच राष्ट्रवादीते जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी तालुक्यातील कोणालाही विश्वासात न घेता उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले. तेथेच राष्ट्रवादीचा पक्षस्थापनेतील मूळ गट आणि नव्याने पक्षप्रवेश केलेल्या गटात बंडाळी निर्माण झाली होती. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. राष्ट्रवादीचे पानिपत झाले. याची जबाबदारी स्वीकारून तालुक्यातील पदाधिकारी राजीनामा देतील काय? गटातटाच्या राजकारणात पक्षाचा बळी दिला, पक्षनेते स्थानिक नेत्यांवर कोणती कारवाई करणार? पक्षनेतृत्वही तालुक्यातील नेत्यांच्या गटबाजीला समर्थन देते का? तालुक्यात एकच नेतृत्व का पुढे आणत नाहीत? या प्रतिक्रियाच पक्षाचे भवितव्य अधोरेखित करीत आहेत. पुरंदरच्या काँगे्रसचा एकखांबी तंबूही या निवडणुकीने हादरला आहे. नुकत्याच पार पाडलेल्या सासवड-जेजुरीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते हवेतच होते. ही हवाच त्यांना या निवडणुकीत अपयशाला कारणीभूत ठरली आहे. नाही म्हणायला बेलसर माळशिरस गणात यश मिळालेले असले, तरीही ते यश पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. तेथील विमानतळाचा मुद्दा आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी कॉँग्रेसला फायद्याची ठरली, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. स्वत:चा हक्काचा दिवे-गराडे गट इतक्या सहजपणी शिवसेना हिसकावून घेईल, अशी अपेक्षाही मनसेच्या नेतृत्वाला नसेल. सेनेची प्रत्यक्ष कामाची पद्धत व मतदारांशी थेट संपर्क, रायत्याचा रखडलेला प्रश्न यामुळे सेनेला मनसेचा गट जिंकता आला. यात मनसेचे तालुक्यातील अस्तित्वच संपले आहे. तीच गत भाजपाचीही.
पुरंदरमध्ये विकासाच्या मुद्द्यावरच शिवसेनेची सरशी
By admin | Published: February 25, 2017 2:12 AM