पुणे: शहराच्या पाण्यात कपात कराल तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे, असा इशारा शिवसेनेच्या वतीने संभाव्य पाणीकपातीच्या विरोधात देण्यात आला. महापालिकेच्या आवारात या कपातीच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रशासानाच्या निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या.एका स्थानिक शेतकर्याच्या तक्रारीच्या सुनावणीत जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाण्यात साडेसहा टीएमसी कपात करावी असा आदेश दिला. त्याविरोधात शिवसेनेने आक्रमक धोरण घेत प्रशासनाचा निषेध म्हणून महापालिकेत आंदोलन केले. महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी बरोबर पाण्याचे हंडे आणले होते. पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, या प्रशासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणा लिहिलेले फलक शिवसैनिकांनी हातात धरले होते. त्याच घोषणाही देण्यात येत होत्या. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी सांगितले की प्रशासनाचा हा आदेश पुण्यावर अन्याय करणारा आहे, तसेच तो जाणीवपूर्वक काढलेला आहे. प्रशासनच आग्रही असलेल्या २४ तास पाणी योजनेची फेरनिविदा जाहीर होणे व त्याच वेळी हा आदेश काढला जाणे यात सुसूत्रता दिसते. पाण्याची गरज निर्माण करून योजना माथी मारायची असा विचार दिसतो आहे. शिवसेना हे होऊ देणार नाही. राज्य सरकारने वाढवून दिलेला पाण्याचा कोटाच मुळात कमी पडतो आहे. पुणेकरांना वेठीस धरण्याचा शिवसेना प्रतिकार करेल.आंदोलनात पुणेकरांच्या पाण्यात तब्बल ६.५० टीएमसी कपात करण्याच्या जलसंपदा विभागातील प्रशासनाच्या आदेशाविरोधात शिवसेनेच्या वतीने महापालिकेत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पुण्यात पाणीकपात कराल तर याद राखा शिवसेनेशी गाठ आहे. प्रशासनाला शिवसेना पाणी दाखवून देईल असा इशाराही देण्यात आला. भोसले यांच्यासह नगरसेवक नाना भानगिरे, विशाल धनवडे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, श्वेता चव्हाण, महिला आघाडीच्या निर्मला केंद्रे, राधिका हरिश्चंद्रे , सुदर्शना त्रिगुणाईत, गीता वर्मा, सविता निकाळजे, सुहासिनी जावळे, रोशन शेख, शाकिरा पठाण, ऊर्मिला नामदास, सुनीता शिंदे, दीपा पाटील, मीना पाटील, रेखा साठे, प्रीती जाधव, प्रगती ठाकूर, किरण साळी आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
पाणीकपात कराल तर याद राखा; पुणे महापालिकेविरोधात शिवसेनेची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:18 PM
शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या आवारात पाणीकपातीच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. प्रशासानाच्या निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या.
ठळक मुद्देशिवसेनेने आक्रमक धोरण घेत प्रशासनाचा निषेध म्हणून महापालिकेत केले आंदोलन प्रशासनाचा हा आदेश पुण्यावर अन्याय करणारा : संजय भोसले