पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्याच्या पश्चिम भागातील पाषाण, सुतारवाडी परिसरात सातत्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. ही समस्या दूर करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी शहर शिवसेनेच्यावतीने पालिका आयुक्तांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तीन अभियंत्यांचे पथक तयार करुन हा प्रश्न मार्गी लागण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन थांबविले.
या आंदोलनात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर संघटक गजानन थरकुडे, शहर उपप्रमुख राजेंद्र धनकुडे, विधानसभा प्रमुख योगेश मोकाटे, विभाग संघटक संजय निम्हण, विभाग प्रमुख संतोष तोंडे, राहुल जेकटे, अजय परदेशी, उपविभाग अधिकारी अमित रणपिसे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गेल्या आठ महिन्यांपासून होत असलेल्या दुषीत पाणी पुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करुनही त्यावर तोडगा काढला जात नाही. केवळ जुजबी दुरुस्ती करुन पालिकेचे कर्मचारी निघून जातात. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या आंदोलन केल्याचे शहरप्रमुख मोरे यांनी सांगितले.