सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेर अविश्वास ठराव घेण्याचे २७ जुलैच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. १८) अविश्वास ठरावाची सभा घेण्याबाबतचे आदेश जारी केले आहे. बुधवारी (दि. १८) खेड पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता या अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेच्या बहुमताला सुरुंग लागल्याने शिवसेनेच्या सभापती विरोधात शिवसेनेच्या बंडखोरांनी केलेल्या गटबाजीने संपूर्ण तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळीच्या हे प्रकरण चांगलेच जिव्हारी लागले होते. राज्यात महाआघाडी सरकार असताना पडद्याआडून राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीने याला खतपाणी घालत अचूक बाण मारुन खेड तालुक्यातील शिवसेनेची भक्कम फळी फोडली होती. शिवसेनेच्या मुख्यालयातून व्हीप जारी केल्यामुळे शिवसेनेचे सदस्य काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
पोखरकर यांच्यासाठी शिवसेनेचा व्हिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:18 AM