पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv jayanti 2022) आता धुमधडाक्यात साजरी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिवजयंतीसाठी कोरोना निर्बंध अधिक शिथिल केली असून, राज्याच्या विविध भागातून जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर शिवज्योत दौडीत दोनशेजण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.
पाठपुराव्याला यश-
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात निर्बंध शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या शिवजयंती सोहळ्यास शासनाने निर्बंध अधिक शिथिल करावे व जास्तीत जास्त शिवप्रेमींना यामध्ये सहभाग घेता यावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध शिथिल करत असल्याचे जाहीर केले. आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा अंत्यत उत्साह शिवजयंती साजरी करू.- अतुल बेनके, आमदार जुन्नर