'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 04:37 PM2023-02-17T16:37:00+5:302023-02-17T16:37:24+5:30

महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री शहा या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यासाठी पावलं उचलणार का?

Shiva Jayanti will be celebrated But boycott the government programme Amol Kolhen's announcement | 'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा

'शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’, अमोल कोल्हेंची घोषणा

googlenewsNext

नारायणगाव : अवघ्या हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे ते यासंदर्भात काय भूमिका घेतात, याकडे सर्व शिव-शंभू भक्तांचे लक्ष लागले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याकामी पुढाकार घेणार का ? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज नाही, याकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘शिवजयंती साजरी करणारच; पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’ अशी घोषणा करीत तमाम शिव-शंभू भक्तांच्या भावनाच खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून खासदार डॉ. कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी १०० फुटी भगवा ध्वज लावावा, अशी मागणी करीत आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांकडे त्यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा करीत आहेत. मात्र पुरातत्व विभाग नियमांवर बोट ठेवून परवानगी देण्याचे टाळत आहे. पुरातत्व विभागाच्या या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करीत खासदार डॉ. कोल्हे यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना ‘जर केंद्र सरकार ३७० कलम हटवू शकते तर, ब्रिटिशकाळात अस्तित्वात आलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या कायद्यात, नियमात का बदल करू शकत नाही,’ असा जळजळीत सवाल केंद्र सरकारला विचारला होता.

केवळ संसदेत आवाज उठवून न थांबता शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्याची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. आता महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे केंद्रीय गृहमंत्री शहा या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावण्यासाठी पावलं उचलणार का? हे पाहावे लागेल. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याविषयी पुढाकार घेणार का ? याकडेही शिव-शंभू भक्तांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shiva Jayanti will be celebrated But boycott the government programme Amol Kolhen's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.