सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील उपबाजार आवारात बाजार समितीच्या वतीने शिवभोजन केंद्र बुधवारी (दि. २६) सुरू करण्यात आले आहे. या शिवभोजन थाळी उपक्रमास गरीब व गरजू व्यक्तींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी प्रतिदिन १०० थाळीचे वाटप होत आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शासनाच्या परिपत्रकानुसार सुपे उपबाजार येथे शिवभोजन थाळी बुधवारी (दि. २६) सुरू करण्यात आली. या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या वेळी येथील गरीब व गरजू घटकांची सततची मागणी असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार येथील केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने सर्वांनी काळजी घेऊन व सर्व नियमांचे पालन करून शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती वसंत गावडे यांनी केले.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक शौकत कोतवाल, विठ्ठल खैरे, बाळासाहेब पोमणे, शशिकला वाबळे, सुनील पवार, जे. पी. जगताप, रत्नाबाई चौधरी, माजी सभापती पोपट पानसरे, संजय पोमण, संपत जगताप, ज्ञानेश्वर कौले, अनिल हिरवे, बी. के. हिरवे, मल्हारी खैरे, मुनिर डफेदार आदी उपस्थित होते.
सुपे येथे बाजार समितीच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
३००५२०२१-बारामती-०१