लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ‘शिवयोग’ टपाल तिकीट काढण्याची विनंती शिवभक्त आणि वनस्पती संशोधक डॅा. सचिन पुणेकर यांनी सरकारकडे केली होती. या प्रस्तावाला चार दिवसांत मंजुरी देऊन शिवनेरीवरील ‘शिवसुमन’ या वनस्पतीचे चित्र असलेल्या या टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात आले.
बायोस्फिअर्स, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुन्नर-आंबेगाव (उपविभाग मंचर), जुन्नर वन विभाग, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, पुणे आणि आम्ही भोरकर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरीवर हा कार्यक्रम झाला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार अमोल कोल्हे, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्रचे एस. एफ. रिझवी आदी उपस्थित होते.
शिवनेरी किल्ल्यावर प्रदेशनिष्ठ प्रजाती 'फ्रेरिया इंडिका' आढळून येते, जी शिवसुमन या नावाने लोकप्रिय आहे. शिवसुमन महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या वन-क्षेत्रातील छोटी, जाड-रसाळ वनस्पती आहे, जी की विशेषतः गिरीदुर्गांवर आढळून येते.
—————————-
‘शिव वृक्ष यज्ञ’ उपक्रम
शिवजयंतीनिमित्त २७ स्थानिक – देशी प्रजातींचा ३९१ वृक्षांचे शिवनेरीवर रोपणदेखील करण्यात आले. उपक्रमाला डॉ. पुणेकर यांनी ‘शिव वृक्ष यज्ञ’ म्हणून नामकरण केले आणि वनविभागाच्या सहकार्यातून त्या वृक्षांचा माहिती फलक देखील शिवकुंजवर उभारला.