मंचर (पुणे) : ज्या पक्षाने शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करणे तसेच जुळवून घेणे मला मान्य नाही. मी असा काय गुन्हा केला होता की, माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. जखमेवर मीठ चोळण्यासाठी मला पुण्यातून लढण्याचा आग्रह करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको, विकासासाठी तसेच शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे, यासाठी शिंदे गटात सामील झालो आहे, असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. २००९ सालीच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
आज लांडेवाडी येथे समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना आढळराव पाटील यांनी शिंदे गटात जाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून ३ जुलैला माझी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे मनाला वेदना झाल्या. मी असा काय गुन्हा केला होता? नूतन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणे चुकीचे नव्हते. हकालपट्टी झाल्यापासून मी अस्वस्थ होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली. मनाला बरे वाटले. मात्र त्या बैठकीत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला. पुणे लोकसभा मतदारसंघाची तयारी करण्याची सूचना करण्यात आली. तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जुळवून घ्या, असे सांगण्यात आले. मात्र मागील २० वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संघर्ष केला. ज्या पक्षाने शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे, त्यांच्या बरोबर हातमिळवणी करणे व जुळवून घेणे मान्य नाही. आढळराव पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वत्र अडवणूक केली. शिवसेनेला डोके वर काढून दिले नाही. स्वतःला काही हवे म्हणून शिंदे गटात गेलो नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको, विकासकामे होण्यासाठी तसेच शिवसैनिकांना स्थैर्य मिळावे म्हणून शिंदे गटात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघातील सर्व शिवसैनिक माझ्याबरोबर असल्याचेही ते म्हणाले.
माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एका शब्दाने अनादर करणार नाही. आम्ही पक्ष बदललेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आयुष्यात जाणार नाही. शिरूरवर भगवा फडकविण्याचा निर्धार सोनवणे यांनी केला. त्यासाठी उद्यापासून मतदारसंघात दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान लांडेवाडी येथील मेळाव्याला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२००९ साली राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी होणार होती, असा गौप्यस्फोट आढळराव पाटील यांनी केला. मात्र शिरूरच्या जागेवरून आघाडी अडली होती. राष्ट्रवादीचे बहुसंख्य खासदार निवडून पाठवण्याचा प्लॅन करण्यात आला होता. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवणार होते. त्यावेळी मला सुरुवातीला मावळमधून लढा, असे सांगण्यात आले. शिक्रापूर येथील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली. मात्र मला गृहीत धरू नका, असा इशारा दिल्यानंतर ती सभा झाली. एका उद्योगपतीच्या मध्यस्थीने मुंबई येथील एका हॉटेलमध्ये पवार यांच्याबरोबर बैठक झाली. त्यावेळी तुम्ही शिरूरमधून लढू नका. तुम्हाला दोन वेळा राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवतो, असा शब्द त्यांनी दिला होता. यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर हा विषय घातल्यानंतर आघाडीचा डाव मोडल्याचे आढळराव पाटील म्हणाले.