ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 - वडकी (ता. हवेली) येथे १९ डिसेंबर रोजी शिवाजी दामोदर गायकवाड (वय ५०, रा. वडकी, तळेवाडी) यांचा जमिनीचा वाद व जुन्या भांडणाच्या कारणावरून माजी महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड याच्यासह आठ जणांनी कोयता, तलवार व लोखंडी सळयांचा वापर करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून गायकवाड यांच्या चुलतभावाने सुपारी देऊन घडवून आणला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने आणखी ३ जणांना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
याप्रकरणी मेघराज विलास वाहळे (वय २३, रा. भुकूम, खाटपेवाडी, ता. मुळशी), शंकर विजय भिलारे (वय २४, रा. कर्वेनगर साइबाबा मंदिरासमोर, पुणे, मूळ वरवडे, ता. आंबेगाव) दत्तात्रय महादेव पाडाळे (वय २३, रा. म्हाळुंगे, ता. हवेली) या तिघांना अटक करण्यात आली असून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा समांतर तपास करीत असताना त्यांना खरे खुनी दुसरेच असल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी २५ डिसेंबरला मेघराज विलास वाहळे यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे कॉल डिटेलची तपासणी केल्यावर पोलिसांना त्याची खात्री पटली़ शिवाजी गायकवाड यांचा पुतण्या पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड याने खुनाची सुपारी दिली होती व त्याने शिवाजी यांचा खून केल्यावर माझा भाऊ अनिल गायकवाड, उत्तम गायकवाड यांच्यासह १३ जणांनी ९ सप्टेंबर २०१५ रोजी हेमंत प्रकाश गायकवाड (वय ३२, रा. वडकी) याचा जुन्या वादाच्याकारणावरून सुपारी देऊन त्याच्यावर पिस्तुलांतून चार गोळ्या झाडून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या वेळी रामदास गुलाब मोडक (रा. वडकी) याने दिलेल्या फिर्यादीवरून १३ जणांना अटक करण्यात आली होती. याच्याविरुद्ध दाखल असलेल्या खुनाच्या मोका केसमधील साक्षीदाराविरुद्ध गुन्हा दाखल होऊन मोक्याची केसकमकुवत होऊन त्याचे भाऊ जेलमधून सुटण्यास मदत होईल व त्याने वरील तिघांना ठराविक रक्कम देण्याचे कबूल करून काही आगाऊ रक्कम दिली. यानंतर पप्पू ऊर्फ सुनील दत्तात्रय गायकवाड याच्या सांगण्यावरून शिवाजी दामोदर गायकवाड याच खून केला.