मुंबई - केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन आता वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माणतेचा जाज्वल्य इतिहास सांगत खासदार खासदार अमोल कोल्हे यांनी संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केला होता.
संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि जाज्वल्य इतिहास जगभर सांगण्याची गरजही व्यक्त केली. ''केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांनी केलेलं धक्कादायक विधान माध्यमातून माझ्या वाचनात आलं, या वक्तव्याचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनायक ठरले ते त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या कल्याणकारी राज्यामुळे आणि स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे,'' असं माझं प्रामाणिक मत असल्याचं कोल्हेंनी म्हटलं.
महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगभर पोहोचवणे गरजेचं
आपण इतिहासाच्या पानांचा धांडोळा घेतला तर, सुरुवातीच्या काळात स्वराज स्थापनेच्या प्रयत्नांविषयी दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आधीच्याही दरबारात शहाजी महाराज यांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, ही स्वामीनिष्ठा त्यामागे होती हे सिद्ध होतंय. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट 1971 साली झाली, असा ऐतिहासिक दाखला सापडते, त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वाला आलं होतं, असा इतिहास कोल्हे यांनी सांगितला. तसेच, संरक्षणमंत्र्यांनी जे विधान केलं. ते चुकीच्या माहितीमुळे किंवा चुकीच्या फीड्समुळे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, यामुळे आपला जाज्वल्य इतिहास नि:पक्ष आणि तर्कसंगतीने देशभर, जगभर सांगण्याची गरज वाटते, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.