पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासनावरील पकड, एखाद्या प्रकरणाचा छडा लावण्याची पारदर्शक पध्दत याची प्रचिती देणारे दुर्मीळ पत्र भारत इतिहास संशोधक मंडळातील मोडी लिपीचे अभ्यासक राज चंद्रकांत मेमाणे यांना पुणे पुरालेखागार येथील पेशवे दप्तरात शिवाजी महाराजाचे हे पत्र सापडले आहे. ‘कौलनामा अजरख्तखाने राजेश्री सिवाजी राजे दामदौलतहू’ अशा फारसी मायन्याची सुरुवात असलेले हे कौलनामा स्वरुपातील पत्र शिवराज्याभिषेकापूर्वीचे आहे. शिवाजी महाराजांचा ‘शरणागतवत्सल’ हा एक वेगळाच पैलू या पत्राद्वारे पहावयास मिळतो.मेमाणे यांना पुणे पुरालेखागार येथील पेशवे दप्तरात शिवाजी महाराजाचे हे पत्र सापडले आहे. या संपूर्ण पत्राचे वाचन मेमाणे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या आगामी पाक्षिक सभेत करणार आहेत. हे पत्र प्रकाशित करण्यासाठी त्यांना मोडी लिपीचे अभ्यासक मंदार लवाटे यांचे सहकार्य लाभले आहे.या पत्राबाबत माहिती देताना मेमाणे म्हणाले, ‘हे पत्र पुणे परगण्यातील जेजुरीच्या सुर्याजी पाटील माळवदकर यांना लिहिलेले आहे. या पत्रातील मजकुरावरून शिवाजी महाराजांची आपल्या प्रशासनावरील पकड किती मजबूत होती, हे समजून येते. शिवपूर्व, शिवकाल, पेशवेकाल आणि आंग्लकालीन असे मोडी पत्रांचे चार कालखंड मानले जातात. हे पत्र शिवकालीन आहे. मूळ पत्राची समकालीन नकल असलेले हे पत्र कौलनामा म्हणजेच आश्वासनपत्र या प्रकारात मोडते.’ हा कौलनामा सुहुर सन समान, खमसेन आणि अलफ म्हणजेच इसवी सन १६५७-५८ म्हणजेच महाराजांच्या राज्यभिषेकापूर्वी लिहिलेले आहे. या पत्रातील घटनेचा उल्लेख सातारा येथील छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या आज्ञापत्रात आणि थोरले बाजीराव पेशवे यांच्या अभयपत्रातही आढळून येतो, असेही मेमाणे यांनी सांगितले.
शिवरायांचे दुर्मीळ पत्र सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 9:53 PM
शिवाजी महाराजांचा ‘शरणागतवत्सल’ हा एक वेगळाच पैलू या पत्राद्वारे पहावयास मिळतो.
ठळक मुद्दे हे कौलनामा स्वरुपातील पत्र शिवराज्याभिषेकापूर्वीचे राज चंद्रकांत मेमाणे यांना पुणे पुरालेखागार येथील पेशवे दप्तरात शिवाजी महाराजाचे हे पत्र सापडले