पुणे : शहरातील बहुचर्चित मेट्रोचे शिवाजीनगर येथे हिंजवडी, शिवाजीनगर आणि वनाज- रामवाडी हे दोन मार्ग एकत्र येतात; पण प्रवाशांना हे मार्ग बदलताना सुमारे १६० मीटर अंतर खाली उतरून जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दोन मजले वाढवून नवीन पादचारी मार्ग उभारून दोन्ही स्टेशन जोडले जाणार आहेत. त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च येणार असून, पीएमआरडीए आणि महामेट्रो हे दोन्ही ५० टक्के खर्च करणार आहेत.
वनाज ते रामवाडी आणि शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय अशी धावणारी मेट्रो लवकरच वनाज ते रुबी हॉल क्लिनिक अशी धावणार आहे. शिवाजीनगर येथे वनाज ते रामवाडी, स्वारगेट ते पिंपरी आणि शिवाजीनगर ते हिंजवडी हे तीन मेट्रो मार्ग एका ठिकाणी येतात; पण यातील दोन मार्गांचे काम महामेट्रो करत आहेत, तर हिंजवडी मेट्रोचे काम ‘पीएमआरडीए’कडून सुरू आहे. महामेट्रो आणि पीएमआरडीएचे मेट्रो स्टेशन यामध्ये सुमारे १६० मीटरचे अंतर आहे. हे स्टेशन जोडले गेले नसल्याने या दोन्ही स्टेशनवर ये-जा करण्यासाठी प्रवाशांना मेट्रो स्टेशनवरून खाली उतरून पुन्हा दुसऱ्या मेट्रो स्टेशनमध्ये जावे लागणार आहे. त्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे पीएमआरडीए आणि महामेट्रो यांच्या माध्यमातून हा दोन्ही स्टेशनला जोडण्यासाठी दोन मजले वाढवून पादचारी मार्ग तयार केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करणार
शहराची वाढती लोकसंख्या, महापालिका हद्दीत समाविष्ट झालेली गावे या पार्श्वभूमीवर पुणे शहरासह जिल्ह्याच्या सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वंकष वाहतूक आराखडा (काम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) हा दर पाच वर्षांनंतर तयार केला जातो. यापूर्वी हा आराखडा २०१९ साली तयार केला गेला होता. या बैठकीत एचसीएमटीआर (रिंग रोड), मेट्रो प्रकल्प या संदर्भात चर्चा झाली. पालिका हद्दीतील लोकसंख्या वाढली आहे, तसेच गेल्या पाच वर्षांत महापालिका हद्दीत नव्याने काही गावांचा समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन सर्वंकष वाहतूक आराखडा तयार तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेे. निओ मेट्रो मार्ग करण्याचा विचार सुरू आहे. या मार्गाचा अभ्यास करून आवश्यक ते बदल महापालिका सुचविणार आहे, असेही आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.