दौंड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी शिवाजी वाघोले तर उपसभापतीपदी उज्ज्वला शेळके बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक हर्षित तावरे यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतीचा सत्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. रमेश थोरात म्हणाले, दौंड बाजार समितीने नेहमीच शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. दिवसेंदिवस बाजार समितीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने आहे. गेल्या महिन्यात कांद्याला प्रतिटनाला २५०० रुपये भाव देऊन राज्यात विक्रम केला. या वाढत्या भावामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा फायदा झाला आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी काटकसरीने कामकाज करावे. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे हित जोपासले आहे. या संस्थेचे काम निश्चितच वाखाण्याजोगे आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, सत्वशील शितोळै, प्रशांत शितोळे, नितीन दोरगे, सुभाष रंधवे, रामभाऊ टुले, नानासाहेब फडके, बाजार समितीचे सचिव मोहन काटे उपस्थित होते.
चौकट
संधीचे सोने करेन
मला पदापेक्षा रमेशअप्पा महत्त्वाचे आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून सभापतिपद दिले. त्यांनी दिलेल्या या संधीचे सोने करेन.
- शिवाजी वाघोले, सभापती
फोटो : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी वाघोले उपसभापती उज्ज्वला शेळके यांचा सत्कार करताना रमेश थोरात आणि मान्यवर.