लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर न्यायालय अवघ्या आठ दिवसांत पुन्हा एका सत्रात सुरू करण्याची वेळ आली आहे. त्यानुसार बुधवारपासून (दि. २३) न्यायालय सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्याने मार्चपासून न्यायालय एका सत्रात सुरू होते. त्यानंतर १५ जूनपासून पूर्णवेळ सुरू झाले आहे. त्यामुळे सुनावण्यांना गती मिळेल, अशी वकील, पक्षकार अपेक्षा होती. त्यानंतर शहर लेव्हल दोनला असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर पुन्हा न्यायालय एका सत्रात सुरू झाले आहे.
करोना पॉझिटिव्ह रेट पाचपेक्षा जास्त असल्यास न्यायालयाचे कामकाज एका सत्रात चालणार आहे. पाचपेक्षा कमी असल्यास पूर्णवेळ चालणार आहे. मात्र, कोरोनाच्या पॉझिटिव्ह रेटमध्ये दररोज बदल होत असतो. तो सारखेच पाचपेक्षा कमी किंवा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेच न्यायालय एका सत्रात करणे योग्य नाही, असा आक्षेप प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांच्याकडे पुणे बार असोसिएशनने नोंदविला आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार न्यायालय एक वेळ सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा न्यायाधीशांनी घेतला आहे. कोरोना परिस्थितीत वकील काळजी घेऊन काम करत आहेत. पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी झाला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी न्यायालय एकवेळ एका सत्रात सुरू ठेवणे योग्य वाटत नाही, अशी खंत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी व्यक्त केली आहे.