लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे प्रस्तावित केल्यानुसार शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात एल आकाराची विस्तारित इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये वाहनतळ, कोर्ट हॉल असणार आहे. यासाठी राज्य सरकारने ९६ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागातर्फे नुकतेच परिपत्रक काढले आहे.
शिवाजीनगर न्यायालयात सुमारे ९० कोर्ट बसतात. त्यातील अनेक न्यायाधीशांना पायाभूत सुविधाही मिळत नाही. त्यामुळे कोर्टमध्ये वाढ करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार विस्तारीत इमारतीत नवीन १५ कोर्टचा समावेश केला जाणार आहे. तसेच पार्किंगचा प्रश्नदेखील भेडसावत होता. या शासकीय मंजूर रकमेपैकी ५७ कोटी ३४ लाख ६६ हजार २४५ रुपये बांधकामाच्या खर्चासाठी वापरण्यात येणार आहेत. याबरोबरच फ्युएल गॅस पाईपलाईनसाठी २५ लाख रुपये, सोलार रुफसाठी १० लाख, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी २५ लाख, अपंगाकरिता सरकता जिना कण्यासाठी ५ लाख, फर्निचरसाठी २ कोटी ५८ लाख, ८० हजार ८०५ रुपये, पाणीपुरवठा मल:निस्सारणसाठी बांधकाम खर्चाच्या पाच टक्के म्हणजे २ कोटी ८६ लाख ७३ हजार ३१२ रुपये, अंतर्गत आणि बाह्य विद्युतीकरणासठी अनुक्रमे २ कोटी ८६ लाख ७३ हजार ३१२ आणि ३ कोटी ४४ लाख ७ हजार ९७५ रुपये, अग्निशामक यंत्रणेसाठी १ कोटी रुपये या आवश्यक बाबींसाठी ९० कोटी ७६ लाख १ हजार ३४९ रुपये मंजूर केले आहेत. याबरोबरच मैदानाचा विकास, वाहतूक व्यवस्था, लॅन्ड स्केपिंग आणि माती, भूमी परीक्षण, या संकीर्ण बाबीसाठी ५० लाख रुपये, रेनवॉटर हार्वेस्टींगकरीता भूअंतर्गत वॉटर टँंक, वॉटर मेन स्टोअरेज, पंपहाऊस व बोअरवेल, वातानुकूलीत यंत्रणा, लिफ्ट, एबी रुम, एरीया लायटींग, पंप, जनरेटर आणि सीसीटीव्हीशी मिळून ३ कोटी ८५ लाख, तसेच आकस्मिक खर्च, ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट, वस्तू व सेवा कर आणि भाववाढ याचा विचार करून २१ कोटी ८६ लाख ५४ हजार, २५९ रुपये मंजूर केले आहेत.
----
कोट
न्यायालयात आता बराकी असलेल्या ठिकाणी एल शिफ्टमध्ये पाचमजली इमारत होणार आहे. त्याच्यामध्ये १५ कोर्ट हॉल असणार आहेत. मोठ्या संख्येने चारचाकी, दुचाकी, सायकल पार्किंगची व्यवस्था असणार आहे. अग्निशामक, रेन हार्वेस्टिंगसह आवश्यक त्या सर्व गोष्टींचा विचार करून बांधकाम होणार आहे. फक्त प्रत्यक्ष कामाला लवकर सुरूवात झाली पाहिजे. लवकरात लवकर फंड मिळून कामाला सुरूवात झाल्यास कमी कालावधीत इमारत बांधून पूर्ण होईल.
- ॲड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन