पुणे: शिवाजीनगर हिंजवडीमेट्रो प्रकल्पाची संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनायडेट नेशन इकॉनॉमिक कमीशन फॉर युरोप ( यूएनईसीई) या संघटनेकडून पाहणी करण्यात आली. कामामध्ये आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन केले जात असल्याबद्दल संघटनेच्या वतीने प्रकल्पाला पायाभूत सुविधा पुरस्कार-२०२३ प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
शिवाजीनगर हिंजवडी ही पुणे शहरातील तिसरी मेट्रो असून त्यामुळे हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली प्रवासी सुविधा मिळणार आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणातंर्गत (पीएमआरडीए) खासगी कंपनीकडून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वावर हे काम सुरू आहे. हा संपूर्ण मार्ग २३ किलोमीटरचा आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुढील ३५ वर्षांसाठी हा मार्ग कंपनीलाच चालवण्यासाठी देण्याचा करार झाला आहे.
या प्रकल्पाला याआधी राष्ट्रीय स्तरावर शहरी विकासासाठीचा स्कोच पुरस्कार-२०२३ मिळाला आहे. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या या संघटनेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संघटना जागतिक स्तरावर काम करत असते. मोठ्या प्रकल्पांसाठी त्यांनी पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक सुविधेचा विचार, कामगारांची सुरक्षा, कामातील सातत्य असे काही निकष संघटनेने तयार केले असून त्याआधारावर जगभरातील मोठ्या प्रकल्पांची विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या पथकाकडून पाहणी केली जाते व त्यानंतर निवड केली जाते.
अथेन्स, ग्रीसमधील अथेन्स येथे अलीकडेच झालेल्या सातव्या ‘यूएनईसीई पीपीपी आणि पायाभूत सुविधा पुरस्कार २०२३’ कार्यक्रमात शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो प्रकल्पाला हे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. प्रकल्पासाठी स्थापन कंपनीने स्थापन केलेल्या पर्यावरण, आरोग्य, सुरक्षा (ईएचएस) टीम, बिझनेस टीम आणि सिव्हिल टीमच्या कामाचा हा सन्मान असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना आलोक कपूर, बिझनेस हेड व उपाध्यक्ष नेहा पंडित तसेच अलोक गोयल (सीएफओ), आणि अक्षय शर्मा (संचालक, प्रकल्प) यांनी व्यक्त केले. जागतिक मंचावर मिळालेली ही विशेष ओळख काम अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी प्रेरणा देणारी असेल असे त्यांनी सांगितले.