राजू इनामदार
पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी ही मेट्रो दिवसभरात लाखभर प्रवाशांना घेऊन धावेल. तेवढ्या प्रमाणात या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. २०० कंपन्यांमधील तब्बल ५ लाख कामगारांमधील सध्या बरेच कामगार वर्क फ्रॉम होम असले तरी डिसेंबरमध्ये त्यांची ही चेन संपणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच मार्च २०२५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या या कामाची गती वाढवावी, अशी मागणी आयटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
वाहतूक कोंडी कमी होईल
हिंजवडी आयटी क्षेत्रात २०० पेक्षा जास्त आयटी कंपन्या आहेत. त्यातील २५ कंपन्या बऱ्याच मोठ्या आहेत. या सर्व कंपन्यांमध्ये मिळून ५ लाखांपेक्षाही जास्त कर्मचारी आहेत. त्यातील एकदम वरिष्ठ असलेले कर्मचारी त्याच भागात सदनिकांमध्ये राहतात, एकदम कमी वेतन असलेले कर्मचारीही त्याच परिसरातील वस्त्यांमध्ये राहतात. तरीही अन्य बरेच कर्मचारी शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून प्रवास करून हिंजवडीला येतात व जातात. त्यामुळे खासगी वाहनांचा फार मोठा वापर या रस्त्यावर होतो. तो या मेट्रोमुळे कमी होण्यास मदत होणार आहे.
वर्क फ्रॉम होम बंद होणार
कोरोना काळात बहुसंख्य आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली. त्यात कंपन्यांचाही फायदा असल्याने कोरोना निर्बंध संपले तरीही अजून तीच पद्धत सुरू आहे. आता मात्र बहुसंख्य आयटी कंपन्यांनी डिसेंबरपासून पुन्हा सर्व कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयटी कर्मचारी सांगतात. यामुळे पुन्हा वाहनकोंडी, प्रदूषण या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांच्यातील अनेकजण आताच त्रस्त झाले आहेत.
एकूण अंतर २३ किलोमीटर, स्थानके २३
शिवाजीनगर हिंजवडी हा शहरातील तिसरा व सर्वात मोठा म्हणजे २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे. मेगापोलीस सर्कल - क्वाड्रन - डॉहलर - इन्फोसिस - विप्रो - पॉल इंडिया - हिंजवडी केएमटी - हिंजवडी पूल - वाकड चौक - बालेवाडी स्टेडियम - निकमार - रामनगर - बालेवाडी हायस्ट्रीट - बालेवाडी फाटा - बाणेरगाव - बाणेर - कृषी अनुसंधान - यशदा - विद्यापीठ चौक - आरबीआय - कृषी महाविद्यालय - शिवाजीनगर - सिव्हिल कोर्ट अशी २३ स्थानके त्यावर असतील.
कनेक्टिव्हिटीला महत्व
याही मेट्रोला सुरुवातीला तीनच डबे असतील. नंतर डब्यांची संख्या वाढवण्यात येईल. त्यादृष्टिनेच स्थानकांवरील फलाटांची बांधणी करण्यात येणार आहे. तीन डब्यांच्या एका मेट्रोतून १ हजार प्रवासी प्रवास करू शकतात. दिवसभरात अशा अनेक फेऱ्यांमधून १ लाखापेक्षाही जास्त प्रवाशांची जा - ये शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोतून होणे अपेक्षित आहे. तेवढ्या प्रमाणात रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होणार आहे. मेट्रोचा वापर व्हावा, यासाठी या मेट्रोकडूनही प्रवाशांना वाहनतळ, कनेक्टिव्हिटी, फर्स्ट माईल टू लास्ट माईल अशी व्यवस्था करून दिली जाणार आहे.
सिव्हिल कोर्ट परिसरात इंटरचेंज
वनाज ते रामवाडी व पिंपरी - चिंचवड ते स्वारगेट या महामेट्रोच्या दोन्ही मेट्रोंचे इंटर चेंज स्थानक सिव्हिल कोर्टजवळ आहे. तिथेच आता २०० मीटर अंतरावर शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचेही स्थानक होणार आहे. ही तिन्ही स्थानके एकमेकांबरोबर फूटओव्हर ब्रिजने जोडली जाणार आहेत. त्यामुळे एका मेट्रोतून दुसऱ्या मेट्रोच्या स्थानकावर जाणे व तिथून प्रवास करणे प्रवाशांना सिव्हिल कोर्ट स्थानकामधून सहज शक्य होणार आहे.
कुठलेही तिकीट कुठेही मिळेल
तिन्ही मेट्रोची तिकीटे कोणत्याही स्थानकावर मिळू शकतील. त्याचे तिकीट दरही सारखेच असणार आहेत. स्थानकाशिवाय ऑनलाईन बुकिंगद्वारेही तिकीट घेता येईल.
शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोची वैशिष्ट्ये
- सर्वाधिक म्हणजे २३ किलोमीटर लांबीचा मार्ग- मार्गावरील खांबांची एकूण संख्या ९४१- जमिनीपासून १५ मीटर उंचीवरून धावणार- पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप : सार्वजनिक खासगी भागीदारी) तत्त्वावर उभारणी- खासगी विकासकाकडेच ३५ वर्षांसाठी नियंत्रण- पीएमआरडीए (पुणे महानगर विकास प्राधिकरण)चा आतापर्यंतचा सर्वांत मोठा प्रकल्प- संपूर्ण मार्ग उन्नत म्हणजे रस्त्याच्या वरूनच- आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रकल्प- काम पूर्ण होण्याची मुदत - मार्च २०२५
''डिसेंबर २०२२ मध्ये ‘वर्क फॉर्म होम’ची कल्पना संपुष्टात येईल. त्यानंतर पुन्हा या रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी निर्माण होणार आहे. त्यामुळे मेट्रोचे काम त्वरित पूर्ण होऊन त्याचा वापरही लगेचच सुरू होण्याची गरज आहे. कामाची गती वाढवायला हवी. यापेक्षा जास्त वेगाने महामेट्रोचे काम होत होते.- सुबोध मोरे, आयटी कंपनीतील अधिकारी''
''आधीच हे काम फार उशिरा सुरू केले गेले. आता खासगी कंपनी असूनही कामाला अपेक्षित गती दिसत नाही. कर्मचारीही मोठ्या संख्येने काम करताना दिसत नाहीत. खासगी कंपनी आहे तर मग त्यांना दिलेल्या मुदतीआधीच प्रकल्प पूर्ण करायला हवा. - आयटी कर्मचारी''