पिंपरी : हिंजवडी येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी असा मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) राबविण्याचा निर्णय आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष व पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली. बापट यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीएच्या संचालक मंडळाची बैठक आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात शुक्रवारी झाली. त्या वेळी पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त संभाजी कडू-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप आदी उपस्थित होते. हिंजवडी मेट्रोच्या प्रस्तावासाठी येणारा खर्च आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर तयार होणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात येईल, असे बापट यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या बैठकीत विकास नियंत्रण नियमावली, सुरक्षा ठेव, झोन दाखला, भाग नकाशा, बांधकाम परवानगी व शुल्क आकारणी, औंध येथील महापालिकेची महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योगभवन येथील जागा भाड्याने घेण्याविषयीची चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी या वेळी पत्रकारांना दिली. (प्रतिनिधी)सर्वंकष आराखड्यासाठी तज्ज्ञांची समितीपीएमआरडीएचा सर्वंकष आर्थिक विकास आराखडा मराठा चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) साह्याने तयार करण्यास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच, ई-निविदा मागवून त्यासाठी आराखडा अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक आराखडा करण्यासाठी सहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी मराठा चेंबरकडून साडेपाच कोटी आणि प्राधिकरणाकडून ५० लाख देण्याचा प्रस्ताव आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी मराठा चेंबरच्या तज्ज्ञ सदस्यांची एक समिती नियुक्त करण्यात येणार असून, त्यामध्ये प्राधिकरणाचे दोन सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव असल्याचे बापट यांनी सांगितले. ३४ गावांच्या निधीवरून जुंपलीपुणे महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या ३४ गावांच्या विकासासाठीच्या निधीवरून महापालिका आणि पीएमआरडीएमध्ये जुंपली. हा निधी आमच्याकडे द्यावा, अशी मागणी पीएमआरडीएने केली. तर या गावांना सुविधा पुणे महापालिका पुरवित असल्याने त्यांच्याकडेच निधी यावा, अशी मागणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली. गावांच्या समावेशाबाबत अभिप्राय देऊन तेथील विकासासाठी किती निधी लागेल, हे पीएमआरडीने कळवावे, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. महापालिकेने केले होते लाईट रेलसाठी सर्वेक्षणशिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे सूतोवाच सहा महिन्यांपूर्वी पुण्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर आता पीएमआरडीएने त्यास मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेकडून या मार्गावर लाईट रेल (ट्राम ) प्रस्तावित करण्यात आली असून, त्यासाठीचा सल्लागार नेमण्याचे कामही प्रशासनाने पूर्ण केलेले आहे. महापालिकेकडून २०१२ मध्ये मेट्रोसाठीचा अहवाल तयार केल्यानंतर हिंजवडीसाठी लाईट रेल अथवा कोलकाता येथील ट्रामच्या धर्तीवर प्रवाशी वाहतुकीसाठी सेवा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार, प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे काम जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सीच्या साह्याने सुरू करण्यातही आले होते. हा मार्ग पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतून जातो. त्यामुळे या तिन्ही संस्थांतर्फे तो हाती घेणे शक्य आहे का, हे तपासून पाहण्याबरोबरच या तीनही संस्थांच्या अनेक बैठकाही झालेल्या आहेत. मात्र, या प्रकल्पासाठी कोणी खर्च करावयाचा याबाबत एकमत तसेच निर्णय होत नसल्याने हा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून बारगळला होता. ‘पीएमआरडीए’ने भाग नकाशा आणि झोन दाखले यांच्या दरात वाढ करण्याचे प्रस्तावित केले आहे. भाग नकाशासाठी ६० रुपयांऐवजी १०००, तर झोन दाखल्यांसाठी ३० रुपयांऐवजी ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. हिंजवडी भागात आयटी कंपन्यांचा विस्तार झाला आहे. मात्र, त्या ठिकाणी जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने वाहतूककोंडी होते. या ठिकाणी मेट्रो प्रकल्प उभारल्यास वाहतूक सुरळीत होऊन नवीन उद्योग उभारण्यास चालना मिळेल.’’- गिरीश बापट, अध्यक्ष, पीएमआरडीए
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो!
By admin | Published: August 29, 2015 4:03 AM