पुणे : पोलिसांच्या घराचा प्रश्न संवेदनशील बनलेला असतानाच पुण्यातील शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये नवीन घरांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. तीन ते साडेतीन एकरांच्या आवारात पसरलेल्या बैठ्या चाळी तोडून त्या ठिकाणी तब्बल २० मजल्यांचे ६ टॉवर उभारण्यात येणार आहेत. पोलिसांना राहण्यासाठी प्रशस्त असे ‘टू बीएचके’ उपलब्ध होणार असल्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चालू वर्षातच निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचा भाग येतो. सध्या १० हजारांच्या आसपास मनुष्यबळ पोलिसांकडे आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या घरांचा मोठा प्रश्न आहे. शिवाजीनगर, सोमवार पेठ, औंध, भवानी पेठ, स्वारगेट आदी भागांमधील पोलीस वसाहतींमधील घरांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतीक्षा यादी आहे. या घरांचीही अवस्था म्हणावी तशी चांगली राहिलेली नाही. देखभाल-दुरुस्तीसह एकूणच स्वच्छतेचाही मोठा प्रश्न या वसाहतींमध्ये आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही पोलिसांच्या कुटुंबांना अनेकदा संघर्ष करावा लागलेला आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाला लागूनच पोलीस वसाहत आहे. या वसाहतीमध्ये ३ इमारतींसह जवळपास अडीचशे बैठी घरे आहेत. साधारणपणे तीन ते साडेतीन एकर परिसरात ही वसाहत वसलेली आहे. बैठ्या घरांमध्ये राहणाऱ्या पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना दोन वर्षांपासून अन्य वसाहतींमध्ये जागा उपलब्ध होईल त्याप्रमाणे हलविण्यात येत आहे. यासाठी मुख्यालयाकडून पोलिसांकडून अर्जही घेण्यात आले आहेत. आता थोडकी कुटुंबे बैठ्या चाळींमध्ये राहत आहेत. त्यांनाही जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या वसाहतीमधील बैठ्या चाळी तोडून तेथे २० मजल्यांचे ६ टॉवर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठीचा सविस्तर प्लॅनही पोलिसांनी तयार केलेला आहे. तसा प्रस्ताव पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाला पाठविण्यात आला आहे. त्यासाठी जवळपास ७८ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शिवाजीनगर पोलीस वसाहत २० मजली!
By admin | Published: March 20, 2017 4:19 AM