पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुणे मेट्राेचे स्थानक या भागात तयार करण्यात येत असल्याने इथले स्थानक नवीन जागेत हलविण्यात आले आहे. आजपासून जुन्या मुंबई - पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी या ठिकाणी हे नवे स्थानक हलविण्यात आले आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर एसटी स्थानक आहे. याच ठिकाणी लाेकलचे स्टेशन तसेच पीएमपीचे स्टेशन देखील आहे. हे स्थानक शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने प्रवाशांसाठी साेयीचे हाेते. सध्या शहरात मेट्राेचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्राेमार्गात शिवाजीनगर मेट्राे स्थानकाचा देखील समावेश आहे. एसटी स्थानकाच्या जागेत मेट्राे स्थानक उभारण्यात येत असल्याने येथील एसटी स्थानक नव्या जागेत हलविण्यात आले आहे. वाकडेवाडी भागातील शासकीय दूध डेअरीच्या मैदानावर नवे स्थानक उभारण्यात आले आहे. या नवीन ठिकाणावरुनच आता सर्व एसटी बसेस सुटणार आहेत. आजपासून या नव्या स्थानकातून बसेस साेडण्यास सुरुवात झाली. नागरिकांच्या साेयीसाठी जे प्रवासी जुन्या शिवाजीनगर स्थानकात येत हाेते तेथून नव्या स्थानकापर्यंत येण्यासाठी वाहनांची साेय करण्यात आली हाेती.
नव्या स्थानकाबाबत बाेलताना प्रज्ञा मांडवीकर म्हणाल्या, नव्या स्थानकाबाबत कळालं हाेतं, परंतु एसटी महामंडळाने नागरिकांना आधी या स्थानकाबाबतची माहिती द्यायला हवी हाेती. त्याचबराेबर या ठिकाणी अद्याप सर्व सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. गाडी कुठल्या प्लॅटफाॅर्मला आहे याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत.
दिलीप ठाेंबरे म्हणाले, नवीन स्थानक सुसज्ज असे तयार करण्यात आले आहे. आधीच्या स्थानकापासून हे स्थानक दूर असल्याने नागरिकांना याठिकाणी येण्यात अडचणी येत आहेत. परंतु येत्या काही दिवसात हे स्थानक देखील नागरिकांच्या परीचयाचे हाेईल.