पुणे : शहरात मध्यवर्ती असणारे शिवाजीनगर एसटी बसस्थानक इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. या जागेवरील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाल्यावरही एसटी महामंडळाने नव्या स्थानकाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाकडेवाडी येथे सुरू झालेले बसस्थानक कायम असेल. त्यामुळे परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे पुणे शहरात येण्यासाठीचे हाल ही कायमच असतील.
महामेट्रोने शिवाजीनगर भुयारी स्थानकाच्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना दिलेल्या माहिती मधून याचे संकेत मिळाले. भुयारी स्थानकावरील जागा एसटी महामंडळाची आहे. भुयारी स्थानकाचे काम पूर्ण झाल्यामुळे ही जागा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्याबाबत महामेट्रो प्रशासन व एसटी महामंडळ यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यात काहीच हालचाल होत नसल्याचे महामेट्रोच्या काही अधिकाऱ्यांनी माहिती देण्याच्या ओघात सूचित केले.
महामेट्रोने त्यांचे शिवाजीनगर भुयारी स्थानक बांधण्यासाठी म्हणून एसटी महामंडळाकडून शिवाजीनगर बसस्थानकाची जागा घेतली होती. आता त्यांचे भुयारी स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे महामंडळाने त्यांच्या जागेवर नव्या एसटी स्थानकाच्या कामाची सुरूवात करणे अपेक्षित आहे. मात्र या संदर्भात त्यांच्याकडून काहीच हालचाल होताना दिसत नाही. महामेट्रो प्रशासनाने त्यांना भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्याचे कळविल्यानंतर ही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद दिला गेला नसल्याचे समजते. सध्या महामंडळाचे शिवाजीनगर बसस्थानकाचे काम वाकडेवाडी मधून सुरू आहे. त्या जागेवर महामेट्रोने सध्याची व्यवस्था करून दिली असून जागेचे भाडेही महामेट्रो प्रशासनच जमा करत आहे.
महामंडळाला या जागेवर सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) स्थानकाच्या जागेवर एसटी स्थानकासह व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र या कामासाठी त्यांना योग्य विकासक मिळत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून विलंब होत असल्याचे समजते.
दरम्यान वाकडेवाडी बसस्थानक परगावहून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी फारच त्रासदायक आहे. तिथून पुणे शहरात येण्यासाठी रिक्षाचालक जास्तीचे पैसे मागतात. त्यातही रात्रीच्या वेळी याचा जास्त त्रास होतो. पीएमपीएलच्या गाड्या आहेत, मात्र वाहनांच्या गर्दीमुळे त्यांना शहरात येण्यास वेळ लागतो. शिवाय रात्रीच्या वेळी त्या बंदही असतात. त्यामुळे हे स्थानक सुरू होणे गरजेचे आहे असे प्रवाशांचे मत आहे.
महामेट्रोचे भुयारी स्थानकाचे सर्व काम पूर्ण झाले आहे. आमची एसटी महामंडळाबरोबर चर्चा सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार आम्ही भुयारी स्थानकात वाहनतळाच्या सुविधेसाठी जागा सोडली आहे.
डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो