लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या कर्ज अधीक्षक आणि वसुली अधिकाऱ्यास सायबर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.
हनुमंत संभाजी केमधरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. केमधरेने बँकेचे चेअरमन अनिल भोसले आणि मंगलदास बांदल यांच्या आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर बनावट व खोटी कर्ज प्रकरणे करून ठेवीदारांच्या ठेवींच्या रकमांचा अपहार करून फसवणूक केली व त्या अपहाराच्या रकमेतून मोठ्या प्रमाणावर बेनामी मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत.
हनुमंत केमधरे हा या गुन्ह्यात फरार झाल्याने न्यायालयाने त्याच्या विरोधात अटक वॉरंट देखील जारी केले होते. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. त्या पथकात पोलीस रवींद्र गवारी, शिरीष गावडे यांची नेमणूक करून त्यांच्यावर आरोपीला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ज्यांनी काही दिवसांपूर्वी बीएचआर गैरव्यवहारातील मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे व सुनील झंवर यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले होते. केमधरे याला न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, महेंद्र जगताप, उपनिरीक्षक महेश मते, महिला पोलीस अंमलदार कोमल पडवळ करीत आहेत.
या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमदार अनिल शिवाजीराव भोसले (वय ५५, रा. बाणेर रस्ता), सूर्याजी पांडुरंग जाधव (वय ६९, रा. कमला नेहरू पार्क), तानाजी दत्तू पडवळ (वय ५०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), शैलेश संपतराव भोसले (वय ४७ रा. नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर), पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास विठ्ठल बांदल, हितेन ऊर्फ हितेंद्र विराभाई पटेल आणि मनोजकुमार प्राणनाथ ॲॅब्रोल यांना अटक केली आहे.
चौकट
कुटुंबाशी तोडला संपर्क
केमधरेने त्याच्याकडील सर्व मोबाईल बंद केले होते. तो त्यांच्या कुटुंबातील कोणाशीही संपर्क साधत नव्हता. मात्र, गवारी आणि गावडे यांनी आरोपी वापरत असलेल्या टेलिग्राम, व्हॉटस्अप इंस्टाग्राम व सोशल मीडिया या सर्वांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीच्या ठावठिकाणांबाबत माहिती प्राप्त केली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, केमधरे हा त्याचा सुगावा लागणार नाही याची पुरेपूर दक्षता घेत आहे. तो त्याचा मित्र रज्जाक मुलाणी यांच्या पुरंदर येथील फार्म हाऊसवर राहात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार गवारी आणि गावडे हे तेथे पोचले व त्यांनी वेषांतर करून केमधरेला ताब्यात घेतले.