सहकार आयुक्त अनिल कवडे आणि रिझर्व्ह बँकेच्या ‘टास्क फोर्स फॉर अर्बन बँक’चे सदस्य विद्याधर अनास्कर यांनी या बँकेचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. ‘आरबीआय’च्या केंद्रीय समितीने ती मान्य केली.
आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने बँकिंग नियमांचे उल्लंघन केलेच आहे. शिवाय बँकेकडे पुरेसे भांडवलदेखील नाही. बँकेची सध्याची अवस्था लक्षात घेता ठेवीदारांचे पैसे देण्यास बँक असमर्थ आहे. त्यामुळे बँकेचे कामकाज चालू दिले असते तर ठेवीदारांचे आणखी नुकसान झाले असते. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यापुढे बँकेला कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास किंवा परत करण्यास मनाई करण्यात आली आहे.
चौकट
ठेवींचे काय?
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत पाच लाख रुपयांपर्यंत ज्यांच्या ठेवी आहेत, अशांना त्यांचे पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) यांच्याकडून पाच लाखांपर्यंतच्या ठेवी ठेवीदारांना मिळतील.
चौकट
बँकेवर येणार अवसायक
“शिवाजीराव भोसले बँकेवर सध्या प्रशासक आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर आता बँकेवर अवसायक (लिक्विडेटर) नेमण्यात येईल. पाच लाख रुपयांच्या आत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना ‘डीआयसीजीसी’कडून येत्या सहा महिन्यांच्या आत पैसे मिळवून देण्याची जबाबदारी अवसायकांची असेल. त्यासाठी या ठेवीदारांचे ‘केवायसी’ त्यांना पूर्ण करावे लागेल. शिवाजीराव भोसले बँकेचे ९८ टक्के ठेवीदार पाच लाख रुपयांच्या आत ठेव असणारे आहेत. व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना परत मिळू शकेल.”
-विद्याधर अनास्कर, बँकिंगतज्ज्ञ