पुणे : एनपीए (अनुत्पादक कर्ज) दिसू नये, म्हणून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत तब्बल ८० कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट दिल्याचे दाखविण्यात आले आहे़ तसेच बँकेवर आर्थिक व्यवहार करण्याचे निर्बंध घातल्यानंतरही बँकेने तब्बल २ कोटी १७ लाख रुपये काढले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसले, सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले यांना आर्थिक गुन्हे शाखेने २५ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली़ या चौघांना विशेष न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ भोसले बँकेचे अध्यक्ष, संचालक असताना जाधव संचालक होते. तसेच पडवळ बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शैलेश भोसले बँकेचे मुख्य हिशेब तपासणीस होते. त्या काळात ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे़ याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले, सध्या या चौघांकडे चौकशी करण्यात येत आहे़ आरोपींनी या रकमेचा वापर कशाकरिता केला, याची माहिती घेण्यात येत आहे़एनपीए दिसू नये, म्हणून बँकेने तब्बल ८० कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट दिले आहे़ पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या भावाला हे कॅश क्रेडिट देण्यात आले आहे़ त्यासाठी २३ धनादेशांचा वापर करण्यात आला होता़ बँकेची आर्थिक गैरशिस्त पाहून रिझर्व्ह बँकेने ६ मे २०१९ रोजी आदेश काढून बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते़ त्यामुळे बँकेच्या खातेदारांना केवळ १ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती़ असे असताना या निर्बंधानंतर बँकेतून तब्बल २ कोटी १७ लाख रुपये काढण्यात आल्याचे आढळून असल्याचे कदम यांनी सांगितले़
शिवाजीराव भोसले बँकेत आणखी ८० कोटींचा घोटाळा झाला उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 5:26 AM