पुणे- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या राजकीय घटनांवर भाष्य केलं आहे. आमदार शिवेंद्र राजे काल मला भेटले होते. त्यांनी पक्ष सोडून जाणार नसल्याचं सांगितलं आहे. तर श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांचेसुद्धा फोन आले होते. तेसुद्धा आम्ही पक्षासोबत असल्याचं म्हणाले आहेत. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे काल माझ्यासोबतच होते. तर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे मला भेटायला येणार असल्याचा खुलासा पवारांनी केला आहे. पुण्यात ते बोलत होते.राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात असल्यानं ते पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली भाजपा त्यांना आपल्या पक्षात घेऊन निवडणूक लढवण्यासाठी दबाव टाकत आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपात येण्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांनी नकार देताच प्राप्तिकर विभागामार्फत त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. सत्ताधारी भाजपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा गैरवापर करत आहे.
सोलापूरचे कल्याणराव काळे यांचा कारखाना अडचणीत सापडल्यानंतर सरकारनं नियम मोडून त्यांना मदत केली, त्यामुळे त्यांना भाजपामध्ये जावं लागलं. ईडी, सीबीआय यांचा वापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात आहे. सरकार राज्य बँकेद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपामध्ये येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. चित्रा वाघ यांचे पती चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत. चित्रा वाघ मला भेटल्या असून, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही त्यांना काहीही मदत करू शकत नसल्याचंही पवारांनी सांगितलं आहे.तर छगन भुजबळ यांच्यावरही खटला भरला असून, त्यांना तुरुंगातही डांबलं होतं. त्यांच्यावर झोपडपट्टीच्या जागेवर टीडीआर देऊन त्याऐवजी महाराष्ट्र सदन बांधून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. भुजबळ यांनी चांगलं महाराष्ट्र सदन बांधलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षही त्याच महाराष्ट्र सदनात बैठका घेतात. एवढं उत्तम महाराष्ट्र सदन बांधलेल्या छगन भुजबळांनाही या सरकारनं तुरुंगात टाकलं, अशी टीकास्त्र पवारांनी फडणवीस सरकारवर सोडलं आहे.