किल्ले शिवनेरी महाराजांची जन्मभूमी ते शंभूराजांची जन्मभूमी असा प्रवास दरवर्षी पायी केला जात होता. पण या वर्षी शासनाच्या नियमांचे पालन करून वाहन प्रवास स्पीकर्स न वापरता साध्या पद्धतीने व सोशल डिस्टन्स पालन करून कमीत कमी लोकांमध्ये शिवनेरीवर राजांना अभिषेक, पूजा, शिवाईदेवीची पूजा करून पालखीचे प्रस्थान केले. त्यानंतर पालखी किल्ले संग्रामदुर्ग येथे पोहोचली. किल्ल्यामध्ये श्री दामोदर महाराजांच्या मंदिरामध्ये पालखीचे स्वागत करून पूजा व आरती आणि महाराजांना मानवंदना झाली. त्यानंतर पालखी श्रीक्षेत्र तुळापूरच्या दिशेने रवाना झाली. तुळापूर येथे भीमा इंद्रायणीच्या संगमावर शिवरायांच्या मूर्तीस गंगास्नान संपन्न करण्यात आले. त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधिस्थळावर संभाजीमहाराजांची आरती व पूजा होऊन पितापुत्रांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वाघोली, केसनंद, कोलवडी, थेऊर इ. ठिकाणी पालखीचे स्वागत झाले. त्यानंतर पालखी थेऊर या ठिकाणी पोहोचली. तेथे श्री गणेशाची व छत्रपतींची आरती संपन्न झाली. त्यानंतर महाराजांना मानवंदना देण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम होऊन सकाळी थेऊरमधून प्रस्थान होऊन पालखी लोणी काळभोर, वडकी, सासवडमार्गे पुरंदरच्या दिशेने रवाना झाली. शासकीय नियमांचे पालन करून बरोबर असणारे शिवप्रेमी नागरिक किल्ल्याच्या पायथ्याला थांबून शासनाच्या नियमानुसार पाच जनानी किल्ल्यामध्ये प्रवेश करून शंभूराजांच्या जन्मस्थळाजवळ जाऊन ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, बाबासाहेब दिघे, संतोष बांगर, नामदेव फल्ले, वसंत थोरात यांनी नियमाप्रमाणे पूजा पुष्पवृष्टी करून तसेच मानवंदना देऊन सोहळा संपन्न केला. उर्वरित शिवशंभूप्रेमींनी किल्ले पुरंदरच्या पायथ्याजवळच असलेले श्री क्षेत्र कोडीत येथील श्रीनाथ म्हसकोबा मंदिरात मानवंदना देऊन पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून पालखी सोहळ्याची सांगता केली. या सोहळ्याच्या आयोजनामध्ये माऊली आबा कुंजीर, पंडित मोडक, किरण झिंझुरके ,ज्ञानेश्वर भांगे, ईश्वर बडधे ,संतोष शिवले, बापू सोनवणे, बाजीराव दुराफे यांनी मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती स्वराज्य संघाचे सचिव शामकांत निघोट यांनी दिली.
Attachments area