आनंद कांबळे /जुन्नर दि.4 - आदिवासी समाजातील वीर पुरुषांनी प्रत्येक लढ्यात भाग घेऊन बलिदान दिले आहे,त्याकरिता प्रत्येक समाजबांधवांनी आपला स्वाभिमान जपला पाहिजे. संघटीत होऊन अन्याय, अत्याचाराविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सतीशदादा पेंदाम यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. आदिवासी विचारमंच व संलग्न संघटनेच्या वतीने आयोजित अभिवादन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.योजनाताई वाजे या होत्या. भारत देशात आदिवासी समाजावर अन्याय होत आहेत. बळजबरीने आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. आदिवासी समाज या देशाचा मूळ समाज असून त्याची भाषा ही देशाची भाषा आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे. सन १६५० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर कोळो महादेव व ठाकर समाजाच्या १६०० वीर पुरुषांनी उठाव केला, सरनाईक खेमा व त्याच्या सहकारी यांनी स्वराज्याच्यासाठी बलिदान दिले. या बलिदानाची आठवण म्हणून आपण आज एकत्र आलो आहोत. समाजासाठी सर्वानी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे.असेही यावेळी पेंदाम यांनी मत व्यक्त केले.जुन्नर-शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या आदिवासी विरांची कमी नव्हती. एक लढवय्या जमात म्हणून आदिवासी पुढे असायचे ,मात्र इतिहासकारांनी या जमातीला प्रसिद्धीपासून दूर ठेऊन त्यांची उपेक्षाच केली. निजमशाहीच्या ताब्यात असलेल्या शिवनेरी किल्यावर त्या वेळचा सरदार रणदुल्ला खान याने स्वराज्यासाठी लढणाऱ्या शूर आदिवासी जमातींना जरब बसावी म्हणून या भागातील शूर वीरांना पकडून 1600 आदिवासी शूर विरांची कत्तल करण्यात आली. पण अशा जरबेला घाबरेल तो आदिवासी कसला? या शूर विरांच्या अभिवादनासाठी (रविवारी 3सप्टेबर ) रोजी स्मारकाजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधव प्रचंड जनसमुदायाने एकत्र आले होते. महाराष्ट्र राज्य आदिवासी विचार मंच व त्यांच्याशी सलग्न असणाऱ्या महाराष्ट्रातील विविध आदिवासी संगटना सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी जुन्नर शहरातुन महाराष्ट्रातील तमाम आदिवासी उपस्तित बांधवानी रॅलीने शिवनेरीवरील कोळी चबुत-याला अभिवादन करण्यात आले.
आदिवासी समाजाचा जनसागर शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 2:49 PM