पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज शिवनेरी किल्यावर जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींच्या मनातील सरकारविरोधी असंतोष उफाळून आल्याचे दिसून आले. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निमित्त होते, ते म्हणजे दरवर्षी शिवनेरीवर शिवजयंती झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण होत असते. यंदा मात्र मुख्यमंत्र्यांनी भाषण केलंच नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त पाळणा जोजवला आणि निघून गेले. आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री 8.55 वाजता किल्ल्यावर येणार होते आणि 10.05 वाजता परत जाणार होते. मात्र 9.35 वाजताच मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने शिवनेरीवरुन उड्डाण घेतलं. यामुळे शिवनेरी किल्यावरुन उतरताना विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना शिवप्रेमींच्या रोषाला तोंड द्यावे लागले. विनोद तावडे आणि पंकजा मुंडे शिवप्रेमींनी त्यांची अडवणूक करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विनोद तावडे काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी होता. दरम्यान, घटनास्थळी गोंधळ वाढत गेला त्यामुळे विनोद तावडे यांनी मागच्या मागे काढता पाय घेतला. ते पाहून पंकजा मुंडेही त्या ठिकाणावरुन निघून गेल्या. मंत्र्यांनी काढता पाय घेतल्याचं पाहून शिवप्रेमींचा संताप आणखी अनावर झाला. त्यांनी ‘शिवाजी महाराज की जय’चा जयजयकार केला आणि सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली.दरम्यान, यावर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिल आहे की, मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे त्यांना जास्त वेळ शिवनेरीवर थांबता आले नाही. राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे होत आहे. तरीही मुख्यमंत्री महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने शिवनेरीवर आले, असे त्यांनी सांगितले आहे.
सरकारविरोधात शिवनेरीवर शिवप्रेमींची घोषणाबाजी...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 5:56 PM