पुणे : 'छत्रपती शिवाजीमहाराज नगर' असे नामकरण करण्यात यावे यासाठी पुणे शिवसेनेने निवेदन देऊन १ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्यावर सुद्धा महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. याच पार्श्वभूमीवर सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेना वर्धापनदिनाचे औचित्य साधत 'छत्रपती' असे नामकरण केले आहे. आणि शहरातील महाराजांचा एकेरी उल्लेख असलेल्या सर्वच ठिकाणी लवकरात लवकर नाव बदल करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे.
पुण्यात शिवसेना विभाग प्रमुख प्रविण डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. १९) शिवसेना वर्धापनदिनाचे औचित्य साधत घोले रोड क्षेत्रीय कार्यालय येथे महाराजांच्या नावापुढे छत्रपती नावाचा नवीन फलक लावला. यावेळी शिवसेना व युवासेनाचे मयुर पवार, तुफान उंडे, अभिजीत धाडवे,शाहरुख शेख,दत्ता कांबळे, निखिल ओरसे,राहुल धोत्रे,भारत डोंगरे,ओमकार डोंगरे, अक्षय कासार हे उपस्थित होते.
यावेळी डोंगरे म्हणाले, मागील वर्षी ९ मार्चला पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना नामकरणासंबंधी निवेदन दिले होते. यावेळी शिवाजीनगर विधानसभा, शिवाजीनगर एसटी बस स्थानक,शिवाजीनगर जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन,शिवाजीनगर वाहतूक विभाग, शिवाजीनगर पोलिस स्टेशन व पोलीस चौकी अशा सर्वच ठिकाणी नाव बदल करण्यात यावा अशी मागणी केली होती. या निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर वरील नावात बदल करू असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही नामकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे नामकरण केले. मात्र, जर पुढील काही दिवसात बाकीचे फलक बदलले गेले नाहीत तर शिवसैनिक त्या जागेवर जाऊन छत्रपतींच्या नावाचा उल्लेख असलेले फलक लावतील.