पुणे : शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयात लवकरच एक नवी भर पडते आहे. बाळासाहेबांची शिवसेना या निवडणूक आयोगाने नाव दिलेल्या पक्षाचे नवे प्रशस्त कार्यालय सारसबाग रस्त्यावर तयार होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा पदाधिकाऱ्यांचा विचार आहे.
माजी नगरसेवक व या पक्षाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. सारसबाग रस्त्यावरील पाटणकर जागेवर हे दोन मजली कार्यालय असेल. तिथे सध्या फर्निचरचे काम सुरू आहे. भानगिरे यांनी सांगितले की पक्षाच्या कार्यालयीन कामकाजासाठी अशा जागेची आवश्यकता होती. त्यामुळे शहराच्या मध्यभागात कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
राजकीय पक्षाचे कार्यालय असते तसेच हेही कार्यालय असेल. पत्रकार परिषदा तसेच वेगवेगळी दालने, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष अशी त्याची रचना असेल. फक्त शहरासाठी नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी हे कार्यालय असेल. मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती दिली असून त्यांनी संमती दिली असल्याची माहिती भानगिरे यांनी दिली. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र येण्यासाठी तसेच बैठका, चर्चा यासाठी जागा हवी होती. ती मिळाली. आता या नव्या जागेतून लवकरच पक्षाचे कामकाज सुरू होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपर्यंत सर्व काम पूर्ण होऊन त्याच दिवशी कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात येणार आहे.