धनुष्यबाणच काय; इंदिरा गांधींचे बैलजोडी, गाय वासरू चिन्हही गाेठवले होते; जाणून घ्या इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:08 PM2022-07-07T16:08:51+5:302022-07-07T16:11:53+5:30
कोण घेणार याबद्दलचा निर्णय...?
पुणे : शिवसेनेतील बंडखोरीला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली, तर धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हाबाबत वाद निर्माण होऊ शकतो. मात्र असा वाद होणे काही नवीन नाही. याआधीही काँग्रेस या सर्वात जुन्या राजकीय पक्षासह बहुतेक राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षांवर निवडणूक चिन्ह गमावण्याची अथवा गोठवले जाण्याची वेळ आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार यांनी याबाबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, मूळ काँग्रेसचे निवडणूक चिन्ह बैलजोडी होते. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतरइंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि पक्षात १९६९ साली संघटनात्मक पातळीवर फूट पडली. इंदिरा गांधी यांनी बैलजोडी चिन्हावर दावा केला, मात्र संघटनेतील जुन्या नेत्यांनी त्यांना दाद दिली नाही. अखेर इंदिरा गांधी यांनी गायवासरू हे चिन्ह घेतले. त्यानंतर १९७८ मध्ये पुन्हा फूट पडली. इंदिरा गांधीच परत बाजूला गेल्या. त्यांनी आय म्हणजे इंडियन व इंदिरा असा दोन्ही अर्थ लावता येतील असे नाव व हाताचा पंजा हे चिन्ह स्वीकारले.
अशी फूट व निवडणूक चिन्हाचा प्रश्न फक्त काँग्रेसच नाही तर कम्युनिस्ट पक्षातही निर्माण झाला हाेता. मार्क्सवादी, भारतीय, लाल निशाण ही सगळी शकलेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षात बाबासाहेबांच्या हयातीत पंजाबसह अनेक राज्यात आमदार होते. हत्ती हे निवडणूक चिन्ह होते. त्यांच्या हयातीतच या पक्षात फूट पडली. त्यांच्या पश्चात तर अनेक गट झाले. समाजवादी पक्षातही प्रजासमाजवादी व नंतर अनेक वेळा फूट पडली. एक वेळेस तर एस. एम. जोशी एका समाजवादी पक्षाचे आणि ना. ग. गोरे दुसऱ्या समाजवादी पक्षाचे अशी वेळ आली होती. त्याही वेळी निवडणूक चिन्हाचे प्रश्न निर्माण झाले. जनता पार्टी, जनता दल, राष्ट्रीय जनता दल ही सगळी त्याचीच उदाहरणे आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
निवडणूक आयाेगच घेईल निर्णय
पक्षातील फूट कशी आहे, पक्षाची घटना काय सांगते, संघटना कोणाकडे आहे, विधिमंडळ किंवा संसदीय पक्षात फूट आहे का, अशा अनेक गोष्टी निवडणूक आयोगाकडून पाहिल्या, तपासल्या जातात. त्यानंतर ते निर्णय घेतात. यात विधिमंडळ पक्ष फुटला आणि संघटना एकीकडे असेल तर वेगळा निर्णय होऊ शकतो. संघटनेतच फूट पडली तर वेगळा निर्णय असू शकतो. शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगच काय तो निर्णय घेईल; पण पक्षातील फूट व निवडणूक चिन्ह हा भारतीय लोकशाहीसाठी फार वेगळा प्रकार नाही, असेही ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले.