पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे ‘शिवसंगम’ शिबिरातील लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या सहभागाने एक प्रकारे भाजपाचे शक्तिप्रदर्शन झाले. भाजपाचा युतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेतील नेते, पदाधिकाऱ्यांच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली आहे. विधानसभेप्रमाणे महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजपा स्वतंत्रपणे लढवून शिवसेनेला धक्का देणार असल्याची चर्चा आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांना मानणाऱ्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी व्यासपीठावर रायगडाचे भव्य कट आउट आणि तोरणा किल्ल्याची प्रतिकृती, मेघडंबरीत छत्रपतींची प्रतिमा, साडेचारशे एकराच्या मैदानावर निनादणारा छत्रपतींचा जयघोष हे वातावरण आगामी काळात भाजपाची स्वतंत्र ताकत उभी करण्याच्या रणनीतीचे संकेत होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पिंपरी-चिंचवडजवळ अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शिवसंगम शिबिराने राजकीय रणनीतीची समीकरणे जुळविल्याचे बोलले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी, खेड, शिरूर भागातील राजकारणावर आगामी काळात परिणाम होऊ शकेल, असा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न या शिवसंगमाच्या माध्यमातून झाला. या शिबिरात मात्र राष्ट्र उभारणीच्या मुद्द्याबरोबर छत्रपती शिवाजीमहाराजांचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आले. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. आगामी काळात सर्वच पातळ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भाजपाने सत्तासाम्राज्याचा विस्तार करण्याची रणनीती आखण्यात आल्याचे दिसून येते.(प्रतिनिधी)
‘शिवशक्ती’तून शिवसेनेला धक्का
By admin | Published: January 05, 2016 2:27 AM