पुणे/मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आपल्याकडे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे करत असल्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार धोक्यात आले आहे. त्यातच, उद्धव ठाकरेंचीशिवसेना विरुद्ध शिंदेगटाची शिवसेना असा वाद रंगला असून दोन्ही बाजूंकडून कायदेशीर प्रकिया सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. याबाबत, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना बंडखोर आमदारांना पळपुटे असं म्हटलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर भाष्य करत बंडोखोर आमदारांवर निशाणा साधला. आसाममध्ये गेलेल्या आमदारांना महाराष्ट्रानं निवडून दिलं आहे. ते आसाममध्ये काय करत आहेत? मतदारसंघातील कामं कोण करणार? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. शिंदेगटाच्या नावाबद्दल विचारलं असता, त्यांनी बाळासाहेबांचं नावच तेवढं मोठं असल्याचं म्हटल.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: त्यांचा उत्तराधिकारी कोण हे सांगितलेलं आहे. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव यांनीच शिवसेना चालवावी हा त्यांनीच घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे, हे नाव जर कोणी वापरत असेल तर त्यात काही चूक नाही. कारण, ते नावच तेवढं मोठं आहे. पण, हे उसन नाव घेतलं, असं राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. सध्या पेरणीचा काळ आहे, लोकांनी आपल्या मतदारसंघात यायला हवं. लोकं आपल्याला कशासाठी निवडून देतात, मतदारसंघातील कामं करण्यासाठी, पण हे आसाममध्ये पंचातारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले आहेत. बंड आपल्या मातीत होत असतो, पळून जाऊन नाही. हा पळपुटेपणा आहे, हिंदीत एक शब्द आहे भगौडे, असे म्हणत बंडखोर आमदारांना सुप्रिया सुळेंनी पळपुटे असं म्हटलं आहे.