Shivsena Vijay Shivtare ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांच्याविरोधात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसंच महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बारामतीची लढत चुरशीची होणार असून मतदार आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आज विजय शिवतारे यांनी भोरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंत थोपटे यांची भेट घेत त्यांना साद घातली आहे. तसंच यावेळी थोपटे यांच्याशी चर्चा करताना शिवतारेंनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे.
अनंत थोपटे यांच्याशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, "अजित पवार यांची मानसिकता खराब आहे. या मानसिकतेच्या विरोधात आपली लढाई आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ६ लाख ८६ मतदार पवारांच्या बाजूने आहेत आणि ५ लाख ५० हजार मतं पवारविरोधी आहेत. या पवारविरोधी मतदारांना आपण मतदानाची संधी द्यायला हवी. मी तर यावेळी निकालच लावणार आहे. लोकांनी साथ देऊन जर लोकं तर ताकदीने उतरले आणि त्यांनी बदल घडवला तर चांगली गोष्ट आहे," अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी आपली भूमिका मांडली.
"पुरंदरमध्ये काय स्थिती आहे?" असा प्रश्न चर्चेवेळी अनंत थोपटे यांनी विचारला. त्यावर बोलताना विजय शिवतारे यांनी म्हटलं की, "पुरंदर एकहाती चालेल. कारण लोकं त्यांच्यावर चिडून आहेत. २०१९ मध्ये मला काय बोलले अजित पवार? तुझा आवाका किती, तू बोलतो कोणासोबत, तू कसा निवडून येतो हे बघतो, अशी भाषा त्यांनी वापरली. त्यांच्यात प्रचंड गुरमी आहे. मी त्यांना माफ केलं, पण लोकं नाहीत माफ करणार. बापू आम्ही नोटाला मतदान करू, पण अजित पवारांना मतदान करणार नाही, असं पुरंदर, दौंड, इंदापूरची लोकं सांगत आहेत. आता काय व्हायचं ते होईल, ते मला फाशी देतील, गोळ्या घालतील, त्यांना काय करायचं ते करू द्या. यावेळी आपले आशीर्वाद असावेत, अशी मला अपेक्षा आहे," असं शिवतारे म्हणाले.
शिवतारेंच्या भेटीनंतर काय म्हणाले अनंत थोपटे?
विजय शिवतारे यांनी भेट घेत आशीर्वाद मागितल्यानंतर प्रसारमाध्यमांनी अनंत थोपटे यांनाही प्रतिक्रिया विचारली. त्यावर थोपटे यांनी अद्याप आपण निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं. "शरद पवार शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. त्यावेळी दिल्ली माझ्यासोबत होती तरी देखील माझा पराभव झाला. तेव्हा माझा पराभव कसा झाला हे सर्वांनाच माहीत आहे. तरीदेखील मी शेवटपर्यंत काँग्रेस सोडली नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार मला भेटून गेले. त्यावेळी जुन्या आठवणी जागा झाल्या. बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता शरद पवारांची मुलगी आणि अजित पवारांची पत्नी निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात शिवतारे उभे आहेत. त्यामुळे कुणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल अद्याप विचार केला नाही. विचार करून याबद्दल निर्णय घेणार आहे," असं अनंत थोपटे यांनी सांगितलं आहे.